
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी बोलतांना माजी आमदार अशोकराव काळे यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील जनतेला न्याय, समता आणि हक्क मिळवून दिले असून त्यामुळे प्रत्येक नागरिकाला समान संधी, स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार प्राप्त झाला आहे. समाजातील वंचित, शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. समाजात बंधुता, समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी संविधानाच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असून हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे माजी आमदार अशोकराव काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पावलस सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, काळे परीवाराचे काकडी व पंचक्रोशीतील गावांवर विलक्षण प्रेम आहे. काकडी येथील असंख्य समाज बांधवांच्या मागणीनुसार मा.खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या सहकार्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा काकडी येथे अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात येतो.माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील आम्हाला वेळोवेळी मदत केली असून आमदार आशुतोष काळे यांनी काळे परिवाराची परंपरा पुढे सुरु ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच परिसर सुशोभीकरण व सभागृह बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सुशोभिकरणाच्या कामासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होवून होणाऱ्या सुशोभिकरणातून भव्य दिव्य स्मारक साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच कानिफनाथ गुंजाळ, काकडीचे पोलीस पाटील मधुकर गुंजाळ, मल्हारवाडीचे पोलीस पाटील बाबासाहेब गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, अरुण सोनवणे, दिपक सोनवणे, इस्माईल शेख, भारत रानोडे, मधुकर सोनवणे,योगेश सोनवणे, विजय सोनवणे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
