
कोपरगाव प्रतिनिधी:-
(राहुरी विद्यापीठ):-
आपल्या विद्यापीठाला महात्मा जोतिराव फुले यांचे नाव मिळाले असून हे आपले भाग्यच आहे. आपल्या विद्यापीठाचा देशातच नव्हे तर देशाबाहेरही नावलौकिक आहे. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षण, समता आणि शेतकऱ्यांसाठी लढा दिला. त्यांच्या विचारांनी भारतीय समाज व्यवस्थेला नवी दिशा दिली. आजचे युग हे विज्ञानाचे व गतिमान संशोधनाचे आहे. या गतिमान युगात आजही त्यांचे विचार प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. नानासाहेब पवार सभागृहात महात्मा जोतीबा फुले यांची 199 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, उपकुलसचिव श्री. व्ही. टी. पाटील, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. सचिन सूर्यवंशी म्हणाले यावर्षीपासून महात्मा फुलेंचे द्विशताब्दी वर्ष सुरू होत आहे. महात्मा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार अजूनही दिशादर्शक आहे. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती. ज्या गोष्टींसाठी त्यांनी त्यावेळी संघर्ष केला त्या गोष्टींसाठी आजही सामान्य जनतेला संघर्ष करावा लागत आहे. स्त्री शिक्षणाचा त्यांनी नुसताच विचार मांडला नाही तर ते कृतीत आणून दाखविले. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी त्यांनी लढा उभा केला. मानव जातीच्या समतेसाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. शेतीला विज्ञानाची जोड द्या, यांत्रिकीकरणावर भर द्या असे पत्र लिहून इंग्रजांना सांगणारे हे पहिले भारतीय होते. पीक स्पर्धा आयोजित करा, गोहत्या थांबवा, जलसंधारण करा असे राज्यकर्त्यांना सांगणारे ते पहिले थोर पुरुष होते.
आपल्या राज्याच्या मातीत समतेचे बीज पेरणाऱ्या ह्या थोर पुरुषाची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची एक संधी आहे. आपल्या विचारांना कृतीत आणून त्या उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणारे हे पहिले थोर पुरुष होते म्हणून ते या देशाचे महात्मा झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कुशाल सोनवणे यांनी केले. स्वागत व पाहुण्यांची ओळख डॉ. विलास आवारी यांनी करुन दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी तृप्ती पाटील व विनया पाटील यांनी तर आभार सुदर्शन लाटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख, प्राध्यापक व पदव्युत्तर महाविद्यालय तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
