“प्रयोगशीलतेतूनच संशोधन संस्कृतीची जडणघडण” :- डॉ. गायकवाड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी : “ विज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुसंस्कृत, सुरक्षित आणि प्रगत होत असते; मात्र त्याचा उपयोग मानवकल्याणासाठीच झाला पाहिजे, ही सामूहिक जबाबदारी आहे. विज्ञान हे जनतेला तारक असले पाहिजे, ते मारक नसावे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक दृष्टी, तर्कशुद्धता आणि नवोपक्रमशीलता या मूल्यांचा स्वीकार अत्यावश्यक आहे. अंधश्रद्धा, गैरसमज आणि अवैज्ञानिक प्रवृत्ती दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासणे गरजेचे आहे. म्हणूनच प्रत्येकाने दैनंदिन जीवनात तर्कशुद्ध विचारसरणी अंगीकारून विज्ञाननिष्ठ वृत्ती विकसित करणे, आवश्यक आहे”. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक संचालक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक डॉ. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे ‘विज्ञान संघटना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’ (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी २०२६ हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.
डॉ. गायकवाड यांनी आपल्या भाषणात ख्रिस्तपूर्व काळातील आर्किमिडीज व सुश्रुत यांच्यापासून न्यूटन, आईनस्टाईन, कोपर्निकस, विल्यम हार्वे, गॅलिलिओ, केपलर, मायकल फॅरेडे, लिओनार्डो दा विंची, बेंजामिन फ्रँकलिन, एडिसन आदी जागतिक शास्त्रज्ञांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, जगदीशचंद्र बोस आदींच्या योगदानाचा उल्लेख करून विज्ञानपरंपरेचा गौरवपूर्ण इतिहास स्पष्ट केला.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “विज्ञानाची खरी ओळख प्रयोगशीलतेत दडलेली आहे. प्रयोगशीलतेच्या अनुशासनामुळेच विचारांना योग्य दिशा मिळून ज्ञानाला विश्वसनीयता प्राप्त होते. निरीक्षण, प्रयोग, पडताळणी व निष्कर्ष या शिस्तबद्ध प्रक्रियेचा स्वीकार केल्यासच संशोधन संस्कृती विकसित होऊ शकते. विद्यार्थ्यांनी पाठांतरावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष प्रयोग, प्रकल्प व नवकल्पनांच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करावे. जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि चिकित्सक दृष्टी यांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत आयक्यूएसी समन्वयक डॉ. निलेश मालपुरे यांनी केले. या प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. संजय शिंदे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता प्रसाद व प्रा. पाटील यांनी केले. तर आभार विज्ञान मंडळाचे चेअरमन प्रा. मोहनसिंह पाडवी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *