कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – सहकाराचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सहकारी साखर कारखान्या बरोबरच अनेक सहकारी संस्था स्थापन करून सहकाराचा प्रसार करून सहकार बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या सहकारी संस्था स्थापन करण्यामागे काटकसर, बचत व स्वावलंबन या त्रिसूत्री बरोबरच संस्थेच्या सभासदांचे हित जोपासून सहकार बळकट करण्याचा महत्वाचा उद्देश होता. या उद्देशातून सभासदांनी संस्थेशी जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार वाढवून व जास्तीत ठेवी ठेवून सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सेवकांची पतपेढी या संस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात पार पडली. याप्रसंगी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षपदी संस्थेचे चेअरमन प्रमोद आभाळे होते. अध्यक्षपदाची सुचना कैलास कदम यांनी मांडली. या सूचनेस सुनील धनराव यांनी अनुमोदन दिले. श्रद्धांजली ठरावाचे वाचन संचालक विलास रोहमारे यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आभाळे यांनी माहिती देताना सांगितले की, माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीपथावर आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या कामगार सभासदांना वैयक्तिक कर्ज पुरवठा, आवश्यक सोयी सुविधा पुरवित आहे. संस्थेने ४ कोटी ६७ लाख ३४ हजार कर्ज वाटप केले असून त्या माध्यमातून व इतर उत्पन्नातून संस्थेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण २३ लाख ७१ हजार रुपयांचा नफा झाला असून यावर्षी सभासदांना ९ % लाभांश देणार असल्याचे सांगितले. यावेळी सभेपुढे मांडण्यात आलेले १ ते १३ विषय सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूर केले.
अहवाल वाचन मॅनेजर कुलदीप गांगुर्डे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्हा. चेअरमन वैभव काळे यांनी केले. यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सहकारी साखर कारखान्याचे सेक्रेटरी बाबा सय्यद, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, कोपरगाव कामगार सभा जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ:- कर्मवीर काळे कारखाना सेवकांच्या पतपेढीच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे समवेत संस्थेचे चेअरमन प्रमोद आभाळे व संचालक मंंडळ.
