कोपरगाव नगरपरिषदेची विकासाचा विश्वासनामा पूर्ततेकडे वाटचाल:- नगराध्यक्ष पराग संधान….

Uncategorized

कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारणसभेत २९ महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत नगरपालिका स्तरावरील विविध विकासकामांसंदर्भात २९ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा विश्वास नामापूर्तीकडे सध्या कोपरगाव नगर परिषदेची वाटचाल सुरू असून, नगरपरिषद हद्दीमध्ये नागरिकांच्या दृष्टीने हितकारक निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने कोपरगाव नगरपालिकेचे विकासकार्य जोमाने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीत पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, मार्केट विभाग, नगररचना विभाग, कर विभाग, स्वच्छता विभाग तसेच बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करून कामे पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. शहरातील जलकुंभांच्या संरक्षणासाठी आवश्यकतेनुसार बार्बड वायर फेन्सिंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पाणीपुरवठा विभागातील येसगाव येथील तलावातील जलमापक यंत्राची देखभाल व दुरुस्ती करण्याचे ठरविण्यात आले. साठवण तलाव क्रमांक १, २, ३ व ४ मधील मत्स्य व्यवसाय ठेका पद्धतीने देण्यासाठी ठेका प्रक्रिया राबवण्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर तसेच गटनेते , सभापती,सर्व नगरसेवक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व तलाव परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.पाच नंबर तळ्याचे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सूचना देण्यात आल्या. कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या तसेच विद्युत तारा, पथदिवे आणि मिरवणूक मार्गास अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याबाबत सर्व नगरसेवकांशी चर्चा करण्यात आली. तसेच शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामागे शहराचे विद्युतीकरण सुरळीत ठेवणे, महापुरुष व देवी-देवतांच्या प्रतिमांची विटंबना टाळणे आणि अपघातांची शक्यता कमी करणे हा उद्देश आहे.
याशिवाय नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळ्यांचे पोटभाडेपट्टा धारकांसंदर्भातील निर्णय प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. आकृती ३८ मधील सांडपाणी व्यवस्थापन व प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प प्रारूप विकास योजनेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तसेच शहरातील हॉस्पिटलमधील निघणारा बायोमेडिकल वेस्ट व्हिलेवाट लावण्याची डॉक्टरांची अडचण समजून घेत त्याकरता इनसिनारेशन प्लांट उभारण्याचा विचार करण्यात आला त्यामधील डीपीआरमधील आरक्षित क्षेत्र एक एकरवरून दोन एकर करण्याचाही निर्णय घेण्यात आला. नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटर इमारतींच्या दुरुस्ती व सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करून पात्र अभियंता किंवा एजन्सीची नेमणूक करण्याचे ठरविण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या मालमत्ताधारकांना ५ टक्के करसवलत देण्याबाबत चर्चा करण्यात आली. स्वच्छता विभागासाठी नवीन जेसीबी व इतर यंत्रसामग्री खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. नगरपरिषदेच्या नवीन रुग्णवाहिकेसाठी चालक, इंधन दर व देखभाल खर्चाबाबतही चर्चा झाली. शहरातील वाढता प्लास्टिक कचरा लक्षात घेता प्लास्टिक प्लेट, कॅरीबॅग व सिल्वर फॉइल प्लेट यांसारख्या वस्तूंवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

तसेच वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान लेखाशीर्ष २२ १७ १३ ०१ अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबवण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. अहवालानुसार पूर्वी कार्यादेश होऊनही कामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांबाबत चर्चा करण्यात आली. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या अण्णाभाऊ साठे बंदिस्त नाट्यगृह सुरू करण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. सायलेंस झोन निश्चित करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र देऊन जागा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.या जनरल मीटिंगमध्ये एकूण २९ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, या सर्व निर्णयांचे नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *