साईंच्या चरणी देशातील क्रमांक एकच्या बँड पथकाची सेवा , शिर्डी परिक्रमेत संजीवनी सैनिकी स्कूलच्या शालेय बँडने दिली साई पालखीस मानवंदना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
साईबाबा यांच्या जीवनकाळात सुरू झालेली आणि आजही अखंड श्रद्धेने जपली जाणारी शिर्डी परिक्रमा २०२६ साली भक्तिभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली. साईबाबा संस्थान शिर्डी, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने दरवर्षी नियमितपणे आयोजित होणाऱ्या या परिक्रमेमध्ये यंदा सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविकांनी सहभाग नोंदवला.
श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, वैजापूर, येवला, राहुरी यांसह राज्यभरातून तसेच देश–विदेशातून आलेल्या भाविकांनी पहाटेपासून परिक्रमा पूर्ण केली. सुमारे ५ ते ७ किलोमीटर अंतराची व ५ ते ७ तास चालणारी ही परिक्रमा श्रद्धा, कृतज्ञता व मन:शांतीसाठी केली जाते.
परिक्रमेची सुरुवात श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या समाधी मंदिरातून झाली. त्यानंतर द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान व खंडोबा मंदिर या पवित्र स्थळांना पायी प्रदक्षिणा घालण्यात आली. ‘ॐ साई राम’च्या अखंड नामस्मरणात साईबाबांची पालखी खांद्यावर घेत भाविक भक्तिभावाने चालत होते. संपूर्ण परिक्रमेदरम्यान स्वच्छता व शांततेचे काटेकोर पालन करण्यात आले.
परिक्रमेचे वैशिष्ट्य : देशातील क्रमांक एक शालेय बँडची मानवंदना
यंदाच्या परिक्रमेत देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावलेल्या संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोपरगावच्या शालेय बँड पथकाने साईबाबांच्या पालखीसमोर बँड संचलन सादर करत मानवंदना दिली. शिस्तबद्ध पावले, भक्तिरसात न्हालेली धून आणि देशभक्तीची ऊर्जा यामुळे उपस्थित भाविक व शिर्डीवासीय मंत्रमुग्ध झाले. अध्यात्म आणि शिस्त यांचा सुरेख संगम या संचलनातून अनुभवायला मिळाला.
ग्रामस्थांकडून कौतुक व आशीर्वाद
या वेळी शिर्डीतील अनेक ग्रामस्थांनी संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. “साईबाबांच्या आशीर्वादाने या विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्तरोत्तर प्रगती होवो, त्यांना अपेक्षित सर्व यश लाभो,” अशा सदिच्छा व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चौकट :-
संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. सुमित कोल्हे यांचे मनोगत :

“आमचा शालेय बँड राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होण्याच्या आदल्या दिवशीच साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी परिक्रमेत सहभागी होण्याचे निमंत्रण संस्थानकडून आले होते. तोच आशीर्वाद आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला राष्ट्रीय स्तरावर विजय मिळाला. मेहनत, जिद्द, चिकाटी व परिश्रम यांसोबत परमेश्वराचा आशीर्वाद तितकाच महत्त्वाचा असतो. त्या ऋणात राहण्यासाठी आज आम्ही साईबाबांच्या सेवेत उपस्थित राहिलो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *