झाडे गेरु आणि चुना लेपणाने टिकवावी :- पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे आवाहन…

Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान वृक्षसंवर्धन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन…
कोपरगांव प्रतिनिधी:-
झाडाला (विशेषतः खोडाला) कीड व बुरशीपासून संरक्षण, कडक उन्हापासून बचाव आणि झाडाचे आरोग्य राखण्यासाठी चुना आणि गेरू लावल्याने त्यांचे आयुर्मान वाढते. झाडांमुळे सजीवांच्या प्राणवायूचा समतोल राखण्यासाठी लोकसहभागातून हे काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले आहे.
प्राचिन ग्रंथात झाडाला विशेष महत्त्व देत “पौधे में परमात्मा होता है” सांगितले आहे. भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक श्रद्धेनुसार पारंपरिक वनस्पतींना ईश्वराचे निवासस्थान मानले जाते, कारण ते सृष्टीचा आधार आहेत. ऑक्सिजनचे स्रोत आहेत आणि जीवनशक्तीने परिपूर्ण आहेत. ते केवळ अनुभवू शकत नाहीत तर निःस्वार्थपणे सेवा देखील करू शकतात, म्हणूनच झाडांना पवित्र आणि दिव्य रूप म्हणून पूजले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचेही वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र “आज्ञापत्र” होते. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वृक्ष आणि पर्यावरणाचे महत्त्व जाणून भारतीय संविधानात तशी कलम ५१ अ मध्ये तरतूद केली आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान वृक्ष संवर्धनासाठी झाडांना गेरु आणि चुना लावण्याचे अभियान यशस्वी करुन महापुरुषांची जयंती त्यांच्या विचार धारेने साजरी करावी.

झाडाला गेरू आणि चुना लावल्याने खोडावर एक प्रकारचे सुरक्षा आवरण तयार होते. त्यामुळे कीड आणि बुरशीपासून संरक्षण होते. चुना आणि गेरूने झाडाच्या खोडावरील भेगा भरून निघतात. पांढरा चुना उन्हाची किरणे परावर्तित करतो. तापमान नियंत्रित राहून खोडाला सुरक्षित ठेवतो. यामुळे मुंग्या, बुरशी आणि झाड पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच कडक उन्हात झाडाचे खोड फाटण्यापासून किंवा होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी पांढरा चुना एक संरक्षक कवच म्हणून काम करतो. हे मिश्रण उन्हाळ्यात झाडाच्या खोडातील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे झाड कमकुवत होत नाही. यामुळे झाडाचे खोड निरोगी राहते आणि लांबूनही झाड व्यवस्थित व संरक्षित दिसते. त्यामुळे झाडाचे आयुर्मान वाढते.

गेरु आणि चुना लावतांना मोठ्या झाडाला चार ते पाच फुटापर्यंत आणि लहान झाड असेल तर तीन ते चार फुटापर्यंत लावावा. खोडाच्या बुंध्याला साधारण तीन फुटापर्यंत गेरु आणि त्याचे वरील बाजूस साधारण दीड फुटापर्यंत चुना लावावा. एका रांगेत अथवा एकत्र झाडी असल्यास एक सारख्या उंचीवर गेरु आणि चुना लावावा. या मुळे झाड दिसतांना आकर्षक दिसेल. ही कृती काळजीपूर्वक करावयची आहे.
लोकसहभागातून होणाऱ्या अभियानात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, नगरपालिका, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, संघटना, मंडळ यांचे सह नागरिकांनी वृक्षसंवर्धन कार्यात उत्स्फूर्त सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *