
कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर व तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासन व नागरीक एकजुटीने प्रयत्न करत असूनही समाधानकारक यश मिळत नाही. कारण कोरोनाची टेस्ट पोसीटीव्ह
आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये दाखल न होता अनेकजण आपापल्या घरीच विलगीकरणात राहातो असे सांगून कोविड सेंटरला जायची टाळाटाळ करत आहेत. काहीजण तर कोरोना पोसीटीव्ह असूनही खुशाल रस्त्यावर फिरतांना दिसतात. काहीजण रिपोर्ट येईपर्यंतही घरात थांबत नाहीत. घरच्यांनाही न जुमानता शहरात फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविणारे सर्वांनाच घातक ठरत आहेत. प्रशासनालाही काही मर्यादा आहेत. मनुष्यबळही कमीच आहे. नगरपरिषद, पोलीस व महसूल विभाग आणि आरोग्य यंत्रणेतील काहीजणही कोरोनाग्रस्त झालेले आहेत.
अशावेळी सर्व आजी माजी नगरसेवक व समाजसेवकांनी दररोज किमान दोन तास तरी आपापल्या प्रभागात-विभागात फिरून कुणाच्याही घरात न जाता, सुरक्षित अंतर ठेवून चौकशी व आरोग्यासाठी सूचना करणे गरजेचे आहे. एखाद्या घरात कोरोना रुग्ण असूनही कोविड सेन्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जात नसेल तर त्वरित तशी माहिती शासकिय यंत्रणेला दिली पाहिजे. तरच रुग्णसंख्या कमी होऊ शकते. असे न केल्यास कितीही दिवस लॉकडाऊन केले तरी चांगले परिणाम मिळणार नाहीत.
सर्व व्यवहार सुरळीत करायचे असतील तर आपल्या सर्वांना कोरोनाविरुद्धच्या संघर्षात प्रत्यक्ष भाग घ्यावा लागणार आहे. नुकतेच श्री.भरत मोरे यांनी प्रभागात फिरून नाविन्यपूर्ण पद्धतीने जनजागृती करून चांगले पाऊल उचलले आहे. सर्वांनी नियम पाळून जनसंपर्क वाढवून जनतेला कोरोना विरुद्ध जागृत केले पाहिजे.
विजय वहाडणे
नगराध्यक्ष,
कोपरगांव नगरपरिषद, कोपरगाव…
