कृषि तंत्र विद्यालय, पुणतांबा येथे विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पुणतांबा येथील कृषि तंत्र विद्यालयात यावर्षी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खर्डे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या विद्यालयाचे माजी विद्यार्थी सहाय्यक कृषि अधिकारी श्री. राजेश पर्हे, कृषि उद्योजक श्री. शंतनू ढमढेरे तसेच खाजगी कंपनीतले अधिकारी श्री. जालिंदर इंगळे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर कृषि तंत्र विद्यालयाचे कृषि सहाय्यक श्री. सोमनाथ लंघे, श्री. किशोर भाकरे, श्री. दिनेश पंडित, श्री. अंबादास इंगळे, श्री. सचिन राऊत उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. पंडित खर्डे म्हणाले की विद्यार्थ्यांनी या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत कृषि विषयक ज्ञान आणि कौशल्य अवगत करून पुढील भविष्यासाठी वाटचाल करावी. कृषि क्षेत्र हे विस्तीर्ण क्षेत्र असून तरुणांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. श्री. पर्हे यांनी कृषि तंत्र विद्यालयातील आपले अनुभव सांगून या ठिकाणी मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमार्फत शेतकर्यांची सेवा करण्याची चांगली संधी मिळते असे सांगितले. कृषि तंत्र विद्यालयात पदविका प्राप्त झालेला विद्यार्थी हा खर्या अर्थाने ग्रामपातळीवर उत्तम कार्य करू शकतो असे त्यांनी सांगितले. श्री. इंगळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या शैक्षणिक कालावधीत अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रातही भरपूर वाव असल्याचे ते म्हणाले. श्री. ढमढेरे यांनी आपल्या कृषि उद्योगाची यशोगाथा विशद केली. यावेळी श्री. लंघे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे असे सांगितले. श्री. भाकरे आणि श्री. पंडित यांनी विद्यार्थ्यांना होस्टेलचे नियम तसेच प्रक्षेत्राची माहिती दिली. द्वितीय वर्षातील मुलांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा यावेळी गुलाब पुष्प आणि पेन देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. ऋतुजा वाघमारे आणि कु. वैष्णवी गवते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *