
कोपरगाव प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्षानिमित्त पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचे स्वच्छता, जनशक्ती, वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान २०२५ अंतर्गत “शिवभक्त अहिल्यादेवी” या नावाने ३०१ बेल व देशी वृक्षारोपण अभियानाची सुरुवात अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रोपण करण्यासाठी बेलाचे रोप देवून पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचे ३०१ बेल व देशी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रसंगी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, कोपरगांवचे तहसिलदार महेश सावंत, निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते, नायब तहसिलदार चंद्रशेखर कुलथे, पोलीस निरीक्षक संदिप कोळी, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपस्थित होते.
पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके हे सूर्यतेजचे संस्थापक असून त्यांनी २५ वर्षात अनेक सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रम आयोजित केले आहेत. तसेच अनेक वर्षापासून पर्यावरण चळवळीत विविध उपक्रम यशस्वी राबवले आहेत. स्वच्छ भारत अभियानाचे ते स्वच्छतादूत असून २५ ठिकाणी विविध फळ, फुलझाडांचे रोपण करुन पालकत्व दिले आहे. गत १२ वर्षात कोपरगांव, शिर्डी, राहाता, वैजापूर, सिन्नर या तालुक्यातसह विविध गावामध्ये एक व्यक्ती-एक झाड हा उपक्रम हाती घेऊन सुमारे ५० हजार पेक्षा कडुलिंब सह विविध झाडांचे लोकसहभागातून रोपण करुन पालकत्व दिले आहे. सर्वत्र आढळणारे तसेच दुर्मिळ जातीचे पक्षी संवर्धनबद्दल ते जनजागृती करतात. त्यांचा कार्याचे दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री” पुरस्काराने गौरविले आहे. यासह त्यांना केंद्र आणि राज्य स्तरावर अनेक सन्मान मिळाले आहेत. पतंगबाजीतील नायलॉन धागा बंदी सह पर्यावरणास हानिकारक ठरणा-या विविध घटनेबद्दल आळा घालण्यासाठी सदैव तत्पर राहतात.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त देशभर विविध उपक्रम राबवले जात आहे. अहिल्यादेवी होळकर या शिवभक्त होत्या. काशी विश्वेश्वर पासून भारतातील अनेक शिवमंदिरांचा त्यांनी स्व: खर्चाने जिर्णोद्धार केला आहे. शिवाला बेलाचे पान अर्पण करुन अनेक शिवभक्त आपली सेवा महादेवाला अर्पण करतात. तसेच आयुर्वेदातही बेल पानाला विशेष महत्त्व आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे नावाने जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झाले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात याचे रोपण होणार आहे. अहिल्यादेवी नावाने रोपण होणा-या ३०१ रोपांचे वितरण, रोपण आणि पालकत्व हे ३०१ व्या जयंती पर्यंत करणार असल्याचे सांगितले. बेलाची रोपं प्राधान्याने शिवमंदिर परिसरात दिली जाणार आहे. या अभिनव पर्यावरण उपक्रमाचे स्वागत होत आहे.
