कृत्रिम बुध्दीमत्ता आणि रोबोटीक्स येणार्या काळात कृषिचा चेहरा बदलणार:- प्रधान सचिव (कृषि) विकास चंद्र रस्तोगी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
कृषि विद्यापीठाने त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमात कौशल्य आधारित विविध कोर्सेसचा आंतर्भाव केलेला आहे. या कौशल्य आधारीत कोर्सेसचा विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता आणि रोबोटीक्स येणार्या काळामध्ये कृषिचा चेहरा बदलणार आहे. कृषि विद्यापीठाने काटेकोर शेती आणि कृत्रिम बुध्दीमत्तेमध्ये चांगले काम केलेले आहे. कृषिमध्ये नविन गोष्टी शिकणे व शिकत राहणे आत्ताची गरज आसल्याचे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव (कृषि) विकास चंद्र रस्तोगी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात राज्याचे प्रधान सचिव (कृषि) विकास चंद्र रस्तोगी व नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. या भेटीनंतर आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करतांना विकास चंद्र रस्तोगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख उपस्थित होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, कृषि तंत्रज्ञान चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके व काष्टी, मालेगाव येथील कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे उपस्थित होते.
विकास चंद्र रस्तोगी पुढे म्हणाले की नविन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार कृषि विद्यापीठांना बहुविद्याशाखीय धोरण ठेवण्यासाठी ट्रॅडिशनल विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करावे. या कृषि विद्यापीठांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पात ए.आय. वर मोठे काम सुरु आहे. या ए.आय.चा आंतर्भाव कृषि यंत्रे व अवजारे निर्मितीमध्ये करावा. कृषि विद्यापीठातील तंत्रज्ञान सर्व शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषि विभागाच्या यंत्रणेबरोबर योग्य तो समन्वय साधण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. शरद गडाख म्हणाले की राहुरी कृषि विद्यापीठात संशोधन, शिक्षण व विस्तार शिक्षणाबरोबरच बिजोत्पादन निर्मितीचे उत्कृष्ट काम करीत आहे. विद्यापीठ बियाणे निर्मितीबरोबरच विविध प्रकारच्या दर्जेदार कृषि निविष्ठा तयार करत आहे. आगामी दोन महिन्यात विद्यापीठ संबंधित विभागाच्या शास्त्रज्ञांकडून कृषि तंत्रज्ञानावर आधारित तीन मिनिटांच्या क्लिप तयार करणार आहे. त्या विद्यापीठाच्या युट्युब चॅनेलवरून प्रसारित करण्यात येतील जेणेकरून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. कौशल्य आधारीत शिक्षणाद्वारे कृषि उद्योजक कसे तयार होतील याकडे विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यापीठाचे 50 वर्षेपुर्वीचे व स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेले संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी मदत होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री. परिमल सिंह यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यत पोहचण्यासाठी पोकराचा विस्तार या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते शक्य आहे. या कृषि विद्यापीठाने ए.आय., आय.ओ.टी., हायपरस्पेक्ट्ररल इमेज मोठा डाटा तयार केला आहे. हा डाटा कृषिमध्ये ए.आय.च्या उपयोगासाठी फार महत्वाचा असून त्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र क्लाउड घेवून त्यावर तो संवर्धन करावा.
यावेळी डॉ. साताप्पा खरबडे यांनी शिक्षणाचा, डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधनाचा, डॉ. गोरक्ष ससाणे यांनी कृषि विस्तार शिक्षण उपक्रमाचा, डॉ. नितीन दाणवले यांनी बियाणे विभागाचा व प्रशासनाचा, श्री. सदाशिव पाटील यांनी वित्त विभागाचा आणि इंजि. मिलिंद ढोके यांनी बांधकामाचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. नितीन दानवले यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी विद्यापीठातील विविध प्रायोगिक प्रक्षेत्र तसेच प्रयोगशाळेंना भेटी दिल्या. यामध्ये कृषि फचारणी ड्रोन प्रयोगशाळा, हायपरस्पेक्ट्रल इमेजींग प्रयोगशाळा, रोबोटीक्स प्रयोगशाळा, फुले स्मार्ट हवामान केंद्र, ऑटो पी.आय.एस. सिंचन प्रणाली, सेंटर ऑफ एक्सलन्स, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रयोगशाळा, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, फळे व भाजीपाला बेकरी प्रक्रिया केंद्र, बियाणे विभाग, कोरडवाहू फळपिके प्रकल्प, भाजीपाला प्रकल्प, नर्सळी, प्रात्याक्षीक प्रक्षेत्र, धनवंतरी, जीन बँक, सेंदिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बांबू प्रकल्प, निवडुंग चारा प्रात्यक्षिक प्रकल्प, कृषि अवजारे प्रकल्प, जैविक खते प्रयोगशाळा व फुले कृषि वाहिनी 90.8 एफ.एम. या प्रकल्पांना मान्यवरांनी भेटी दिल्या. या ठिकाणी संबंधित शास्त्रज्ञांनी प्रकल्पाबाबतची माहिती मान्यवरांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आनंद चवई यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *