अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान; लाॅकडाऊनमुळे ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांच्या पोटात दोन घास घालता आले तर तेवढेच समाधान:- प्रा.विजय शेटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
‘लॉक डाऊन ‘ कधी चुकूनही न ऐकलेला शब्द ; मात्र आता हा शब्द कानावर पडला तरी अंगावर काटा उभा राहतो . गेल्या वर्षी या एका शब्दाने भल्याभल्याना देशोधडीला लावले. गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या धक्क्यातून आता कोठे सावरतच होतो तर पुन्हा कोरोनाच भूत देशासमोर उभं राहील ! त्याच्या मागोमाग त्याचं अपत्य लॉक डाउनही नाव बदलून आलं . यावेळी त्याच नाव बदलून मिनी लॉक डाऊन उर्फ ब्रेक द चेन असं झाले. नाव जरी बदललं तरी हातावर पोट असलेल्यांच्या वाढणाऱ्या दुःखात वाढ होण्याचं थांबलं नाही . सर्व उद्योग बंद , दुकाने बंद, मंदिर बंद , रोजंदारीचे बहुतेक ठिकाण बंद झाल्याने मजूर वर्गाची उपासमार सुरु झाली . कोरोनामुळे अचानक वाढलेली रुग्णसंख्या, त्यांना उपचारासाठी इंजेक्शन , बेड , ऑक्सिजनचा तुटवडा याचा एकाच गदारोळ उडाला . त्यामुळे सगळी यंत्रणा तिकडे मदतीसाठी धावत सुटली ,यात काही खरी खरी मदत करीत आहे , कोरोनाच्या आजाराने मरणाऱ्यांची संख्या स्पष्ट दिसत आहे. मात्र कोरोनामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळून उपासमारीने मरणाऱ्यांकडे कोणाचेच लक्ष नव्हते. अशा या माणसांसकडे लक्ष गेले ते माणुसकी जिवंत असलेल्या एका साध्या माणसाचे . ते म्हणजे प्रा. विजय शेटे . नावाप्रमाणेच रागावर विजय मिळवलेली व्यक्ती म्हणजे विजय शेटे सर ! त्यांनी या भुकेल्यांची गरज ओळखून तात्काळ आपल्याकडे उपल्बध असलेल्या सामग्रीतून ३०० लोकांना घरपोहच जेवणाचे डबे सुरु केले . त्याकामी त्यांचे शाळेचे कर्मचारी किरण बाविस्कर , निलेश देशमुख आदी सहभागी झाले .
सध्या ते आपल्या कोऱ्हाळे तालुका राहाता येथील श्रीगणेश शैक्षणिक संकुलात सर्व स्वयंपाक बनवून डब्यांमध्ये भरून शिर्डी , राहाता , कोपरगाव परिसरामध्ये घरपोहच करीत आहे. प्रा. शेटे सरांच्या म्हणण्यानुसार ३०० जेवणाचे डबे ही अत्यल्प सेवा आहे . सध्याच्या बंदच्या परिस्थितीमध्ये या परिसरात ५ हजार जेवण डब्यांची गरज आहे. मात्र आपण हि गरज पूर्ण करू शकत नाही याचे शल्य मनामध्ये सलत आहे. सध्या आपण करीत असलेल्या कार्यामध्ये अनेक दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करीत आहे. त्यात अनेक जण गहू , तांदूळ , तेल आदी शिधा दान करीत आहे. अशाच प्रकारे मदत वाढल्यास या डब्यांची संख्या आणखी वाढविण्याचा आपला प्रयत्न असेल . सध्या कोरोनाच्या नावाखाली ‘कण भर करून मन भर दाखविण्याचे ‘ दिखाऊ मदतीचे सगळीकडे निव्वळ रंगमंच उभे राहिले असताना आपण करीत असलेल्या मदतीचा कोठेही गवगवा न करता केवळ कर्तव्य भावनेतून मदत करण्याचा एक चांगला आदर्श प्रा. विजय शेटे यांनी घालून दिला आहे.

याबाबत शेटे सरांची जेष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. . ‘दादा आपण छोटी माणस, आॅक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर गरजूंना मिळवून देण्याची ताकद आपल्यात नाही. या महामारीतील लाॅकडाऊनमुळे ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांच्या पोटात दोन घास घालता आले तर तेवढेच समाधान. कूणी गरजू असेल तर नाव कळवा’. कोविडच्या काळाकृट्ट संकटाला अशा अनेक भरजरी, रूपेरी आणि लखलखत्या झालरी आहेत. सर्व काही संपलेले नाही, संपणारही नाही असा संदेश ते देत आहेत. या युध्दजन्य परिस्थीतीत चांगले डाॅक्टर आयसीयुत कोविड रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करताहेत. नर्स आणि ब्रदर यांना तरी झोप कुठेय. स्वच्छता कर्मचारी राबराब राबताहेत. सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते आपल्या परिने झटत आहेत. जगात चांगले लोक देखील आहेत. संख्येने कमी असले तरी त्यांच्या कामाची शक्ती फार मोठी आहे. महामारी संपल्यावर आपली कुणीही आठवण ठेवणार नाही याची यातील प्रत्येकाला जाणीव आहे. हे सर्वजण देवदुत आहेत, त्यांचे आपल्या जाणीवेवाचून काहीही अडणार नाही. ते कुणी चांगले म्हणावे, प्रमोशन, प्रसिध्दी किंवा शाबासकी मिळावी यासाठी हि शिकस्त ते करीत नाहीत. कुणी तज्ञ डाॅक्टर गाजावाजा न करता, हेल्पलाईन चालवून रूग्णांवर औषधोपचार करताहेत. कुणी रूग्णांना औषधे आणि बेड मिळवून देत आहेत. आपण भोवतलच्या अशा चांगल्या माणसांच्या पाठीशी उभे रहायला हवे. शेटेसर अशाच चांगल्या माणसांपैकी एक. त्यांच्या या उपक्रमासाठी ब-याचजणांनी मदतीचे हात पुढे केलेत. हि आणखी एक आनंदाची गोष्ट. भोवताली खुप चांगल्या गोष्टी घडत असतात. शुन्यातून विश्व निर्माण करणारे आणि भाजी विकणा-या आई वडीलांच्या कष्टाच्या कमाईतून इंजिनिअर झालेले शेटे सर खरे तर आपल्यासारख्या सामान्यांचे प्रतिनीधी. त्यांना भुकेची धग माहीती आहे कारण त्यांनी ती सोसलीय. त्यांच्यातील माणुसकी त्यामुळेच जिवंत आहे. आपल्या भोवताली धनिक काय थोडे आहेत का. दानत नसेल तर श्रीमंतीचा तोरा शुन्य. मनाची श्रीमंती हवी, शेटेसरां सारखी. असे अनेक शेटेसर गावोगाव कामाला लागलेत. त्यांची संख्या वाढत राहो, रंजल्या गांजल्यांना त्यातून आधार मिळो. हि साईचरणी प्रार्थना. शेटेसरां सारखा एक श्रीमंत मित्र लाभला याचे समाधान वाटते. शेटे सरांचा मोबाईल क्रमांक – ९२२६४१६०५५ त्यांचा उत्साह वाढवू यात. गांवोगावचे शेटे सर शोधू यात, शक्य असेल तर आपणच शेटेसरां सारखे होऊ यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *