सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे दिमाखदार उद्घाटन….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“मार्गदर्शनापेक्षा मला तरुण पिढीशी अनौपचारिक संवाद नेहमीच आवडतो. स्पर्धा परीक्षेचा कधीच बाऊ करू नका. बाऊ करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण नियोजन अधिक महत्त्वाचे आहे. जगाशी स्पर्धा करण्याऐवजी आधी स्वतःशी स्पर्धा करा. ती केली की तुम्ही जिंकलेच समजा.” असे प्रतिपादन कोपरगावचे नवनियुक्त तहसीलदार मा. महेश सावंत यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे होते.
मा. सावंत पुढे म्हणाले की, “बदलत्या जीवनशैली व शिक्षण पद्धतीमुळे सध्याची तरुण पिढी काहीशी भरकटलेल्या अवस्थेत दिसतेय. त्यांची अवस्था पावसाच्या पाण्यासारखी आहे. त्याला जर योग्य दिशा मिळाली नाही तर ते वाया जाते. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना इच्छाशक्ती कठोर परिश्रम व उपयुक्त साधनांचा योग्य उपयोग केल्यास यश नक्की मिळते. स्वतःला दुर्बल समजणे आणि ग्रामीण भागातील असल्याचा न्यूनगंड त्यागला पाहिजे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा अशोकराव रोहमारे म्हणाले की, “आमच्या महाविद्यालयातील ग्रंथालय एक समृद्ध ग्रंथालय असून येथे हजारो संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर उच्चशिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वृंद असल्याने त्यांचे वारंवार उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत राहते. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी असून देखील या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उच्चपदावर नोकरीत आहेत. याचे श्रेय आमच्या स्पर्धा परीक्षा केंद्राला जाते. विद्यार्थ्यांनी भविष्यात देखील या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करताना प्र प्राचार्य डॉक्टर विजय ठाणगे म्हणाले की अनेक प्रकारचे अभ्यास इतर उपक्रम राबविले जातात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो. आमच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मोठ्या मुद्द्यावर आज नोकरीत आहेत. गेल्या अनेक वर्षांची ही यशस्वी परंपरा यापुढेही सुरू राहील, असा आशावाद व्यक्त करतो.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उद्योगरत्न पद्मविभूषण कै. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी विशेष अतिथी मा. डॉ. संदीप मिश्रा (U-19 भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार) यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या समारंभासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या समारंभाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके यांनी केले तर सदस्य डॉ. रवींद्र जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जिभाऊ मोरे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा. संपत माळी प्रा. सोमासे, प्रा. सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळ: मा.तहसीलदार महेशजी सावंत साहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *