नगरपालिका शाळेस आदर्श शाळा पुरस्कार जाहीर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
5 सप्टेंबर रोजी सर्वत्र भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य अमूल्य आहे. त्यातही काही शाळा व शिक्षक या सातत्यपूर्ण, नित्य नियमाने नवनवीन शैक्षणिक कृतीयुक्त उपक्रम व प्रकल्प राबवत असतात. अशा आदर्श शाळा व शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचा उचित सन्मान व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ आदर्श शाळा,आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श तंत्रस्नेही शिक्षक असे पुरस्कार प्रदान करत असतो. राज्यसंघाचे अध्यक्ष आदरणीय अर्जुन कोळी,
ज्योत्स्ना भरडा उपाध्यक्ष ,
संजय आवळे उपाध्यक्ष,
सुभाषराव कोल्हे कार्याध्यक्ष,
किशोर पाडवी सरचिटणीस यांच्या समितीने नगरपालिका व महानगरपालिका शाळा व शिक्षक यांना आदर्श पुरस्कार जाहीर केले. अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव नगरपालिका शाळा क्रमांक ५, आदर्श शाळा पुरस्कारा करिता निवड करण्यात आली. सदर पुरस्कारांचे वितरण नाशिक या ठिकाणी होणार आहे . सदर शाळेचे कामकाज डिजिटल पद्धतीने चालते. शिक्षकांनी स्वतः विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे. अँड्रॉइड टीव्ही, इंटर ऍक्टिव्ह बोर्ड याच्या मदतीने अभ्यासक्रमास पूरक घटक दृक श्राव्य पद्धतीने शिकविले जातात. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, सहल, क्षेत्र भेटी, कृतीयुक्त अध्ययन अनुभूती,थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी, शासनाचे विविध सप्ताह, शिष्यवृत्तीच्या शासकीय योजना , विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. शाळा परिसरात विविध प्रकारची वृक्ष व वनस्पतींची लागवड केलेली आहे. विविध प्रकारच्या स्पर्धा, प्रासंगिक कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात. शिक्षक स्वखर्चाने विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व इतर मदत पुरवितात.लोकसहभागातून शाळेस अनेक दानशूर मदत करतात. शाळेत येणारे विद्यार्थी हे वीट भट्टी कामगार, कष्टकरी मजुरांची मुले-मुली आहेत. राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात, बेट भागातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, नगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या यशामागे मुख्याध्यापक विलास माळी शिक्षक सुनील रहाणे,नसरीन पठाण व अमोल कडू यांचे मोठे योगदान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *