जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांच्या निविदा मंजूर करून कोल्हे गटाच्या नगरसेवकांचे मनसुबे उधळले:- संदीप वर्पे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विकासकामांच्या निविदा पाशवी बहुमताच्या जोरावर नामंजूर केल्या होत्या. त्या विकासकामांच्या निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात कलम (३०८) अन्वये मंजूर करून कोपरगाव शहरवासीयांना न्याय दिला असून कोपरगाव शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाना यश आले असून दुसरीकडे मात्र विकासकामात खोडा घालण्याचे कोल्हे गटाच्या नगरसेवकांचे मनसुबे उधळले गेले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

       कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य आदी विभागांच्या विकास कामांच्या निविदा मंजुर करण्याबाबतचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हि विकासकामे मंजूर होणे अत्यंत महत्वाचे होते. मात्र शहरविकासात नेहमीच राजकारण करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताचा चुकीचा उपयोग करून या विकासकामांचे ठराव नामंजूर केले होते. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांसह कॉंग्रेस, मनसे तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात कलम (३०८) अन्वये या विकासकामांना मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. त्या मागणीचा कायदेशीरपणे विचार करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेल्या सर्व विकासकामांना मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे कोपरगाव शहरवासीयांनी स्वागत केले असून राष्ट्रवादी व शिवसेनेकडून फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी संदीप वर्पे बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही कोपरगाव शहराच्या विकासाची बाजू जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तरपणे मांडली. तत्पूर्वी सर्वसाधारण सभेत देखील कोल्हे गटाच्या नगरसेवकांना विनंती करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.  मात्र आपल्या नेत्याचा आदेश पाळण्यासाठी शहरविकासाला तिलांजली देत विकासकामात राजकारण करण्यात त्यांनी धन्यता मानली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सत्याची बाजू घेवून कोपरगाव शहराच्या जनतेला अपेक्षित असणारा निकाल दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे कोल्हे गटाच्या नगरसेवकांना तोंडघशी पडावे लागले आहे. आमदार आशुतोष काळे यांनी राजकारण बाजूला ठेऊन जनहिताच्या सर्व कामांसाठी वहाडणे यांना कायम पाठिंबा राहील असे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही सर्व विकासाच्या सोबत अर्थात कोपरगाव शहरातील जनतेसोबत आहोत. कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नावर राजकारण करू नये, अन्यथा जनता येत्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा संदीप वर्पे यांनी यावेळी दिला. हि विकासकामे मंजुरीकामी अॅड. विद्यासागर शिंदे व अॅड. सुजय जगताप यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.  
     यावेळी बोलतांना नगरसेवक मंदार पहाडे म्हणाले की, कोपरगाव शहराचा विकास व्हावा अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका होती त्या भूमिकेतून नेहमीच शहरविकासाला प्राधान्य दिले आहे. मात्र कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी कामे नामंजूर केली होती त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात कलम (३०८) अन्वये दिलेला निकाल हा काम करण्याची दूरदृष्टी असलेल्या आमदार आशुतोष काळे व कोपरगाव शहराच्या जनतेचा विजय आहे. डॉक्टर अजय गर्जे म्हणाले की, नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे कुणी नव्हते हे कोपरगाव तालुक्याचे दुर्देव  होते मात्र आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने ती उणीव भरून निघाली आहे. आमदार अशुतोष काळे दिलेले चॅलेंज पूर्ण करतात. पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न देखील त्यांनी चॅलेंज समजून स्वीकारला व मार्गी लावला आहे. शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग डडीयाल म्हणाले की,  हा कोपरगावच्या विकासाचा व सत्याचा विजय असून या पुढे देखील शिवसेना नेहमी विकासासोबत राहील.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, आमदार आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा विषय अनुत्तरीत होता या विकासकामांना मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रश्न देखील निकाली निघणार होता. त्यामुळे विकासाला खीळ घालण्यासाठी विरोधाला विरोध करण्यासाठी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पाशवी बहुमताच्या जोरावर नामंजूर केलेल्या निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केल्या. यावरून कोपरगावच्या जनतेने यापुढे विकासकामे करणाऱ्यांना बहुमत द्यायचे की? विकासात खोडा घालणाऱ्यांना याचा निर्णय घ्यावा. यावेळी  नगरसेविका सौ सपना मोरे म्हणाल्या की, कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेल्या विकासकामांच्या निविदा आमदार आशुतोष काळे यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे व त्यांनी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केल्या. त्यामुळे शहरविकासाला चालना मिळणार असून आम्ही नेहमीच शहरविकासाच्या बाजूने असलायचे सांगितले. यावेळी नगरसेवक हाजीमहेमूद सय्यद यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक संदीप वर्पे, राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, डॉ. अजय गर्जे, धरमशेठ बागरेचा, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल,नगरसेविका सौ. सपना मोरे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षा शिंगाडे, हाजीमेहमूद सय्यद, सुनिल शिलेदार, राजेंद्र वाघचौरे,अजिज शेख, रमेश गवळी,डॉ. तुषार गलांडे, निखिल डांगे, नवाज कुरेशी, राहुल देवळालीकर, आकाश डागा, सागर लकारे,संदीप कपिले, जावेद शेख,चंद्रशेखर म्हस्के, अंबादास वडांगळे,वाल्मिक लहिरे, धनंजय कहार,महेश उदावंत, ऋषिकेश खैरनार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *