केंद्र शासनाने ने ५० लाख मे टनाचा बफर स्टॉक करण्याबाबतचे धोरण जाहीर करावे :- आमदार आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- अतिरिक्त साखर उत्पादनामुळे बाजारपेठेत साखरेचा पुरवठा स्थिर राहावा व साखरेच्या दारात घसरण होवू नये व त्याचा परिणाम ऊस दरावर होवू नये यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून केंद्र शासनाने २०२०-२१ करिता ५० लाख मे. टनाचा बफर स्टॉक करण्याबाबतचे धोरण तातडीने जाहीर करावे. तसेच बफर स्टॉक २०१८-१९ व २०१९-२० पोटी साखर कारखान्यांना मिळणारे अनुदान त्वरित अदा करावे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडलेल्या अधिमंडळाच्या ६७ व्या (ऑनलाईन) वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संचालक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, कारखान्याचे सर्व पदाधिकारी सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, २०१९-२० च्या गळीत हंगामात राज्यात ७९ सहकारी व ६८ खाजगी असे एकूण १४७ साखर कारखान्यांनी घेतलेल्या गाळप हंगामात राज्यामध्ये ५४५.२५ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन ६१.६० लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा हा ११.३० राहिला आहे. कारखान्याच्या २०१९-२० हंगामात ३,६५,०६२ मे. टन ऊसाचे गाळप करून ३,९४,००० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.७९ मिळाला असल्याचे सांगितले. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकरी हित जोपासले आहे. तोच वारसा पुढे सुरु ठेवून २०१८-१९ मध्ये ऊस दर एफ.आर.पी. प्रती मे. टन रुपये २२६७.७८ असतांना प्रती मे. टन २३२.२२ जादा दर देऊन प्रती मे. टन रुपये २५००/- रक्कम अदा केली आहे. तसेच मागील गळीत हंगाम २०१९-२० मध्ये केंद्र सरकारचे धोरणानुसार कारखान्याची देय एफ.आर.पी. प्रती टन २३९२.४६ असतांना कारखान्याने ऊसाची पहिली उचल प्रती टन २,५००/- रुपये ऊस दर हंगाम सुरुवातीपासून ते हंगाम संपेपर्यंत कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक समान दराने पेमेंट अदा केले आहे. दीपावली सणानिमित्त रु.१००/- प्रती मे.टन अदा केले आहे. या प्रमाणे रु.२६००/-प्रती मे.टन दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती मे. टन रु. १००/- जादा दर दिला असल्याची माहिती दिली व दरवर्षीप्रमाणे कारखान्यास ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
मागील दोन हंगामापासून अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झालेला आहे साखर निर्याती शिवाय साखर साठे कमी होणार नाही त्यासाठी केंद्र शासनाने साखर निर्यातीचे दीर्घकालीन धोरण घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. साखर निर्यात धोरण सप्टेंबर महिन्यातच जाहीर होणे अपेक्षित होते त्यास विलंब होऊन ते डिसेंबर महिन्यात घेण्यात आले त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीव दराचा फायदा कारखानदारीला मिळाला नसल्याचे नमूद करून उशिरा निर्णय घेतल्यामुळे साखर निर्यातिचे करार होऊन देखील साखर गोडावून मध्ये पडून आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीव दराचा फायदा कारखानदारीला मिळण्यासाठी व अतिरिक्त साखर साठा कमी करण्यासाठी केंद्र शासनाने १०० लाख मे. टन साखर निर्यात धोरण घेणे आवश्यक असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
विषय पत्रिकेचे वाचन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले. यावेळी सभेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या सभासदांनी अनुमोदन देऊन विषय पत्रिकेवरील १ ते १० विषय मंजूर केले. सभेचे सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर आभार संचालक ज्ञानदेव मांजरे यांनी मानले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार कारखान्याच्या सभासदांना सभेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उत्कृष्ट प्रकारचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने ऑनलाईन पद्धतीने या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी झाले होते. त्यासाठी सभासदांना आपले अभिप्राय नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी सभासदांना ऑनलाईन पद्धतीने अभिप्राय मांडण्यास सांगितले व तांत्रिक अडचणी येत असल्यास आपले अभिप्राय लेखी स्वरुपात व्यवस्थापनाकडे देण्याचे सांगितले.
चौकट :- अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. साखर उद्योगासाठी दीर्घकालीन धोरण राबविण्याची आवश्यकता आहे. मागील तीन महिन्यापासून देशांतर्गत साखरेला उठाव नाही. त्यामुळे कारखान्यांची गोडावून साखर साठ्यांनी भरलेली आहे. पुढील हंगामात तयार होणारी साखर ठेवण्याची अडचण कारखान्यांपुढे निर्माण होणार आहे त्यासाठी साखर निर्यातीचा कोटा १०० लाख मे. टन करणे आवश्यक आहे :-आमदार आशुतोष काळेे.


फोटो ओळ:-
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे समवेत माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम व संचालक मंडळ व विभागाचे पदाधिकारी.
