
कोपरगाव प्रतिनिधी:- निळवंडे कालव्यांच्या द्वितीय चाचणीच्या माध्यमातून लाभक्षेत्र व दुष्काळी भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर कालव्यांना पाणी देखील सोडण्यात आले, मात्र कोपरगाव तालुक्यातील पाझर तलाव या पाण्याने भरले नाही. त्यामुळे या भागात प्रशासना विरूद्ध मोठा रोष दिसून येत आहे. पाण्यापासून वंचित राहणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि.१६) पासून पंचक्रोशीतील शेतकरी रांजणगाव देशमुख या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. जो पर्यंत या भागातील पाझर तलाव भरले जात नाही तो पर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी सर्व शेतकऱ्यांनी केली.उपोषणासाठी प्रातिनिधिक स्वरूपात अँड योगेश खालकर, गजानन मते, डॉ. अरूण गव्हाणे, कैलास रहाणे,आण्णासाहेब गांगवे,संजय बर्डे आदी बसणार आहे. तसे निवेदन सबंधितांना देण्यात आले आहेत.
निळवंडेच्या पाण्याची वाट दुष्काळी भागातील शेतकरी गेली ५३ वर्षांपासून पाहत आहे. सहा महिन्यापूर्वी प्रथम चाचणी झाली तर १४ ऑक्टोंबरला दुसरी चाचणी सुरू झाली. लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव भरले जातील अशी अपेक्षा या भागातील शेतकऱ्यांना होती. मात्र ही आशा फोल ठरताना दिसत आहे. १४ ऑक्टोबरला सोडलेले पाणी लाभक्षेत्रात येण्यास तब्बल आठ दिवस लागले. कालव्याची क्षमता ९०० क्युसेस असताना तो फक्त ४०० क्युसेसने चालविला गेला. कालवा जास्त क्षमतेने चालविला असता तर पृच्छ भागातील सर्वच शाखांना एकाचवेळी शक्य झाले असते. मात्र तसे झाले नाही. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस कालवा वाहिला तरी कोणत्याही गावचा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला नाही. या दरम्यान पाणी चोरी देखील मोठ्या प्रमाणात झाली मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले. कोपरगाव तालुक्यातील एकाही गावात पाणी पोहचलेच नाही. याविरूद्ध संतापाची लाट शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने बुधवारी रांजणगाव देशमुख मध्ये बैठक घेऊन प्रशासनाविरूद्ध लढा उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीमध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निळवंडे धरणाच्या सुरू असलेल्या चाचणीच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील पाझर तलाव भरून द्यावे, कालव्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या अडचणी व अतिक्रमणे दूर करणे, पाझर तलाव निम्मे भरल्या नंतर सांडवा उकरून खालच्या भागातील पाझर तलावांना पाणी देणे, शेतकरी संघर्षावेळी केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण केले जाणार आहे.
या बैठकीसाठी परिसरातील लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
