
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून नागरिकांना आजारावर वेळेवर उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त लोकसंख्या असलेल्या कोपरगाव शहरातील भागासाठी आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मिळावे यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून कोपरगाव शहरातील गांधी नगर, दत्त नगर, हनुमान नगर, इंदिरा नगर, गोरोबा नगर या भागासाठी महायुती शासनाकडून आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहराची दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या त्यामुळे सर्वच नागरिकांना वेळेत चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आ. आशुतोष काळे यांची नेहमीच धडपड सुरु असते. वाढत्या शहरीकरणामुळे आरोग्य सुविधा पुरविण्यात आरोग्य यंत्रणेवर देखील काहीसा ताण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत. उपचार घेतांना त्याना कोणत्याही अडचणी येवू नये यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून ग्रामीण रुग्णालयाला १०० बेडचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. तरीदेखील राज्य व केंद्र शासनाच्या आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त फायदा मतदार संघातील जनतेला मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या एन.यु.एच.एम.अर्थात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी यापूर्वी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करून आणले असून त्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा दिली जात आहे.
परंतु कोपरगाव शहरातील ज्या भागात अधिक लोकसंख्या आहे त्या भागासाठी आरोग्य वर्धिनी केंद्र मिळावे यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील गांधी नगर, दत्त नगर, हनुमान नगर, १०५ गोरोबा नगर या जास्त लोकसंख्या असलेल्या भागातील नागरिकांसाठी महायुती शासनाकडून आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मंजूर करून घेतले आहे. या आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये एक एम.बी.बी.एस. डॉक्टर, एक कर्मचारी परिचारिका, आरोग्य सेवक, एक परिचर आदी कर्मचारी असणार आहेत. आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार असून कोपरगाव शहराची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांद्वारे रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाणार असून नागरिकांचा आरोग्यासाठी करावा लागणारा आर्थिक खर्च निश्चितपणे कमी होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सागितले आहे. आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल कोपरगाव शहरातील गांधी नगर, दत्त नगर, हनुमान नगर, इंदिरा नगर,गोरोबा नगर या भागातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
