
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या कार्यकाळात कोपरगाव शहरात आणि मतदारसंघात नागरिकांना पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. ही कामे करताना त्या कामाचा ठेकेदार कोण आहे याचा त्यांनी कधीही विचार केला नाही, फक्त ती कामे दर्जेदार झाली पाहिजेत, असा त्यांचा कायम आग्रह असतो. कोपरगाव नगर परिषदेच्या कामांच्या बाबतीत स्वारस्य असणाऱ्या संदीप वर्पे यांची स्नेहलताताई कोल्हे यांच्यावर टीका करण्याची अजिबात पात्रता नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी संदीप वर्पे यांनी स्नेहलताताई कोल्हे यांच्यावर बिनबुडाचे व खोटे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपात कसलेही तथ्य नाही. वर्पे यांची कारकीर्द कोल्हे कुटुंबीयांमुळे घडली. कोल्हे परिवारामुळेच वर्पे यांना राजकीय ओळख मिळाली, त्यामुळे त्यांनी कोल्हे परिवारावर खोटे आरोप करण्यापूर्वी नीट विचार करायला हवा होता, असा सल्ला भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दिला आहे.
संदीप वर्पे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना दत्ता काले यांनी म्हटले आहे की, वर्पे हे ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाचे गेली अडीच वर्षे राज्यात सरकार होते, त्या काळात तत्कालीन विविध मंत्र्यांशी आपले किती घनिष्ट संबंध आहेत, असा आभास निर्माण करून अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकून स्वत:च्या स्वार्थासाठी त्याचा वापर करण्यात वर्पे हे व्यस्त होते. त्यांना कोपरगावच्या विकासाशी कसलेही सोयरसूतक नाही. आपणच किती हुशार व तज्ज्ञ आहोत हे दाखविण्यातच त्यांचा अख्खा दिवस जातो. वर्पे यांच्या मागे किती जनाधार आहे याचे आत्मपरीक्षण करून मगच त्यांनी कोल्हे कुटुंबीयांवर बोलण्याचे धाडस करावे. आपल्या राजकीय स्वार्थ आणि फायद्यासाठी दुसऱ्यांचा वापर करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपण आणि आपले कुटुंब यापलीकडे शहरासाठी त्यांचे योगदान काय, यावर त्यांनी चिंतन करावे. आजपर्यंत ते एकदाही जनतेतून निवडून आलेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या खांद्याचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्या वर्पे यांची योग्यता किती हे जनतेला माहीत आहे.
विकासकामांच्या ठेकेदारीवर भाष्य करणाऱ्या वर्पे यांनी ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे इतरांवर चिखलफेक करण्याऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण करावे. वर्पे यांनी ज्या २८ विकासकामांचा उल्लेख केला आहे, त्या कामांची वाढीव अंदाजपत्रके बनवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होणार होता हे लक्षात आल्यामुळे भाजप, शिवसेना व रिपाइंच्या तत्कालीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचाराचा डाव उधळून लावण्यासाठी ही वाढीव अंदाजपत्रके रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे प्रशासनाला ही अंदाजपत्रके दुरुस्त करावी लागली, ज्यामुळे शहरातील नागरिकांचे दोन ते अडीच कोटी रुपये ठराविक लोकांच्या घशात जाण्यापासून वाचले. सध्या वर्पे यांची सुरू असलेली धडपड ही त्या २८ कामासारखी आहे. आपल्या जवळच्यांना जास्तीची कामे मिळावी व त्यातून आपला फायदा व्हावा यासाठी संदीप वर्पे यांनी व्यूहरचना आखून ठेवली होती, ती उधळली गेल्याने वैयक्तिक आर्थिक नुकसान होईल, या रागाने वर्पे यांनी कोल्हे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून स्वत:चे समाधान करून घेतले आहे, असे काले यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरात विद्यमान लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ठोस कामे न झाल्यामुळे आपल्याला जनतेसमोर जाता येत नाही म्हणून साप….साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार करून वर्पे हे नागरिकांची दिशाभूल करत आहेत. दुसऱ्यांवर टीका-टिपण्णी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी वर्पे आणि त्यांच्या आडून बातम्या पेरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी पार पाडावी. शून्य महत्त्व असणाऱ्या अनेकांच्या नावाने कोल्हे कुटुंबीयांवर टीका करण्याची बाळबोध पद्धत राष्ट्रवादीने यापुढे न थांबविल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा काले यांनी दिला आहे.
चौकट……
ज्या संदीप वर्पे यांना कोल्हे परिवाराने मोठे केले ते त्यांचे झाले नाहीत, तर ते आज ज्या विद्यमान आमदारांसोबत आहेत, ते त्यांचेही झाले नाहीत. त्यामुळे ते कोपरगावकरांचे होणे अशक्य आहे. वर्पे यांची विद्यमान आमदारांपेक्षा स्वत: मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे सवंग लोकप्रियतेसाठी ते असे खोटेनाटे आरोप करतात, असा सणसणीत टोला दत्ता काले यांनी लगावला आहे.
