“मुलींना संधी व साथ दिल्यास त्या समर्थ बनतील”:-डॉ. रमेश सानप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- “महाविद्यालयीन पदवी घेणे एवढेच विद्यार्थ्यांचे ध्येय नसावे; तर कर्तृत्वाचे शिखर गाठणे हे ध्येय असावे. मात्र ,त्यासाठी पाया मजबूत असणे गरजेचे आणि हा पाया पक्का करण्याचे काम माता -पालक उत्तम प्रकारे करू शकतात. अशा माता पालकांना घराबाहेर पडण्यासाठी तसेच आपला पाल्य घडविण्यासाठी कुटुंबातील सर्वच घटकांनी संधी व साथ द्यावी म्हणजे त्या आपोआपच समर्थ बनतील” असे प्रतिपादन एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले.
महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार, पद्मभूषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत झालेल्या माता- पालक मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.सानप यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, पालक मेळाव्याप्रसंगी बहुधा पुरुष पालकांचीच उपस्थिती असते.माता पालकांना घराबाहेर पडण्याला फारशी संधी मिळत नाही. हे लक्षात घेऊनच कदाचित संस्थेने माता -पालक मेळाव्याचे आयोजन करण्याचे सुचविलेले होते. त्यानुसार माता पालकांची भूमिका जाणून घेण्याच्या उद्देशाने आम्ही हा माता पालक मेळावा आयोजित केला आहे. आमच्या महाविद्यालयात परिसरातील दूर दूरच्या गावातील विद्यार्थी- विद्यार्थिनी प्रवेश घेतात. या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा विचार करून मुलींसाठीचे वसतीगृह, स्वतंत्र जिमखाना, डायनिंग हॉल अशा सुविधांबरोबरच इतर गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीनेही एन.सी.सी., डान्स अकॅडमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा सुविधांचा लाभ महाविद्यालयाकडून करून दिला जातो. याची उपलब्धी म्हणून महाविद्यालयाची पूजा गवळी ही विद्यार्थिनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये कक्ष अधिकारी म्हणून मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
मुलं मुली वडिलांपेक्षा आईजवळच मन मोकळं करतात. त्यामुळे मातांची जबाबदारी मोठी आहे. हे लक्षात घेऊन मातांनीही आपल्या पाल्यांच्या जबाबदारीबाबत सजग असावे, त्या दृष्टीने महाविद्यालयांमध्ये वेळोवेळी मेळाव्यांना हजर राहावे. सुसंवाद करावा, असे आवाहनही डॉ. सानप यांनी केले.
या मेळाव्यात उपस्थित माता पालकांपैकी कविता गमे, वर्षा शिरोदे, सुनीता थोरात, सीमा भाबड, उषा मगर इत्यादी माता पालकांनीही आपापली मनोगते व्यक्त केली आणि महाविद्यालयाविषयीचा आदर व्यक्त करण्याबरोबरच आपल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. कुमारी ऋतुजा खर्डे आणि नीलम मगर या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातून मिळणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करून, मुलींनीही आपल्या मातांना अशा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी प्रेरित करावे, आग्रही असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून उपस्थित माता भगिनींचे स्वागत करून डॉ. उज्ज्वला भोर यांनी माता पालक मेळावा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे,प्राध्यापक, सर्व महिला प्राध्यापक, महाविद्यालयीन अधीक्षक, महिला कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. संगीता दवंगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *