अहमदनगर जिल्ह्यात संजीवनीत एकमेव परीक्षा केंद्र...
कोपरगांव प्रतिनिधी:-
भारत सरकारच्या मानव व संसाधन मंत्रालयाने इंजिनिअरींग, फार्मसी, मेडीकल, इत्यादी सर्वच क्षेत्राशी निगडीत अद्ययावत ज्ञान संबंधितांना अवगत व्हावे, या हेतुने मागील काही वर्षांपासून इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नालाॅजी (आयआयटी), चेन्नईच्या मदतीने नॅशनल प्रोग्राम ऑन एनहान्स्ड लर्निंग (एनपीटीईएल) ही परीक्षा घेतली जाते. यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यातील परीक्षार्थींना पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद येथे जावे लागत असे. परंतु संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सदर परीक्षेचे केंद्र सुरू झाल्यामुळे परीक्षार्थींची मोठी सोय झाली आहे. रविवारी झालेल्या परीक्षेत १७५ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी मध्ये विध्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे अद्ययावत शिक्षण मिळावे म्हणुन वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी केली आहे. यात उच्च श्रेणीचे काॅम्प्युटर्स सहीत १ जीबीपीएस क्षमतेची इंटरनेट सुविधा असुन संगणक क्षेत्रातील तज्ञ प्राद्यापक कार्यरत आहे. या सर्व सुविधांमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात एनपीटीइएलचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. येथिल सुविधामुळे एका वेळी ५०० विध्यार्थी एका स्लाॅट मध्ये परीक्षा देवु शकतात, म्हणजे तीन तासांची परीक्षा असेल तर रोज १००० विध्यार्थ्यांची सोय येथे झालेली आहे.
रविवारी सर्व प्रथम संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर यांचे हस्ते या परीक्षा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी अकॅडमिक डीन डाॅ. ए. बी. पवार, परीक्षा केंद्र पमुख प्रा. ए. ए. बारबींड, टीसीएस कंपनीचे प्रतिनिधी श्री प्रदिप तिवारी व श्री अमोल जाधव व एनपीटीईएल स्टुडंट चाप्टरचे प्रमुख प्रा. आर. बी. पठ्ठे उपस्थित होते.
अनेक संस्थांच्या तसेच अशा संस्थांमधिल कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मुल्यांकणासाठी एनपीटीईएलच्या कोर्सेसची खुप मदत होते. तसेच नोकरी मिळविण्यासाठी मुलाखतीच्या वेळेस अधिकचे कोणते कोर्सेस उमेदवाराने पुर्ण केले आहे, हे ही पाहीले जाते. सदरचे कोर्सेस हे केंद्र शासनाचे असल्यामुळे अत्यंत महत्वाचे मानले जातात. या कोर्सेच्या परीक्षेसाठी आपापल्या क्षेत्रातील विषय निवडून ५-६ महिने अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते. या कोर्सेसचा कालावधी विषयानुसार ४, ८ किंवा १२ आठवड्यांचा असतो. अभ्यासार्थींना व्हीडिओ लेक्चर्स व इतर माध्यमातुन संबंधित अभ्यासक्रमाचे ज्ञान प्राप्त करून दर आठवड्याला एक ऑनलाईन असाईनमेंट पुर्ण करणे गरजेचे असते. व कोर्सचा कालावधी संपल्यानंतर ऑनलाईन परीक्षा देणे गरजेचे असते. संजीवनी मध्ये परीक्षा देण्याची व मार्गदर्शन मिळण्याची सुविधा झाल्यामुळे जिल्ह्यातील अद्ययावत ज्ञान घेणाऱ्या ज्ञानार्थिंची मोठी सोय झाली आहे.

फोटो ओळी: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात एनपीटीईएल परीक्षा केंद्राचे उद्घाटन करताना डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.
