करंजीच्या सुरजची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात दिल्ली येथे भरारी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नवी दिल्ली येथे ९ वे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन, प्रगती मैदानावर १४ ते १६ सप्टेंबर २२ या कालावधीमध्ये पार पडले. या प्रदर्शनीत यंदा ९ व्या इन्स्पायर पुरस्कारासाठी देशभरातून सुमारे ५५६ विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांची निवड केंद्र शासनाच्या संस्थेद्वारे करण्यात आली होती.संपूर्ण देशातून ६.५३ लाख विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि प्रयोग यांची मांडणी केली होती त्यातून हे सर्व बालवैज्ञानिक केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ सनदी अधिकारी व एन.आय.एफ. चे तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत निवड करण्यात आली होती.यात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व ३१ विद्यार्थ्यांनी केले. त्यात अहमदनगर जिल्ह्यातून,तसेच रयत शिक्षण संस्थेच्या,उत्तर विभागाच्या सर्व शाखांमधून एकमेव कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय, करंजी,तालुका कोपरगाव या ग्रामीण भागातील सर्व साधारण परिस्थितीत शिक्षण घेत असलेला,अल्पभूधारक शेतकरी पोपट सोपान जगताप यांचे पुत्र सुरज जगताप यांने या विद्यालयाचे कलाशिक्षक संदीप दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने या प्रदर्शनी मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले.


सुरज ने शेतकऱ्यांचा मित्र हे उपकरण तयार केले होते. या उपकरणाच्या आधारे जे शेतकरी अल्पभूधारक आहेत ,त्यांच्याकरिता पेरणी करणे, निंदणी करणे,रोपाला माती लावणे, अनावश्यक असणारे तन काढणे, रोपांना खत देणे व ज्या शेतकरी मित्रांना पाठीचा त्रास आहे, जे शेतकरी पाठीवर फवारणी यंत्राचा वीस ते पंचवीस किलोचा बोजा घेऊन फवारणी करू शकत नाही त्यांच्याकरिता या शेतकरी मित्र उपकरणाचा फायदा होऊ शकतो. अल्प भूधारक शेतकऱ्यांना बैलाचे पालन पोषण करणे, मजुरांचा, यांत्रिक अवजारांचा, इंधनाचा खर्च न परवडणारा आहे. अशा विविध समस्यांवर उपाय म्हणून हे पाच प्रकारचे काम करणारे ,एक शेतकरी मित्र उपकरण कल्पना सुरजला सुचली .त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम मार्गदर्शक शिक्षक संदीप चव्हाण व सुरज चे पालक पोपट जगताप यांनी केले. हे उपकरण प्रत्यक्ष शेतीमध्ये कार्यरत होऊ शकते. यास साधारणता सात ते आठ हजारापर्यंत खर्च आल्याचे सुरजने सांगितले. सदरचा सर्व खर्च हा एन. एफ.आय. या केंद्र शासनाच्या संस्थेने केला आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचा समारोप विज्ञान भवन,नवी दिल्ली येथे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या शुभहस्ते गौरव करून करण्यात आला.
या सुरजच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे,उत्तर विभागीय अध्यक्ष नामदार आशुतोषजी काळे, उत्तर विभागीय अधिकारी कन्हेरकर टी.पी. उपविभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर ,तापकीर साहेब,तसेच रयत शिक्षण संस्थेचे ,जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन, कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शेख शबाना, स्थानिक शालेय समितीचे सांडु पठाण, डॉ.सुनील देसाई, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी,शिक्षण प्रेमी ग्रामस्थ देविदास भिंगारे,संतोष भिंगारे,कृष्णा अहिरे, संजय शिंदे, विद्यालयातील उपशिक्षक झालटे देविदास,सौ.आशा अनाप,बरडे सिद्धार्थ,सांगळे गजानन,ललित जगताप,वनसिंग वसावे,सचिन डांगे,गवनाथ डोखे,अनिल सरोदे,पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षण विभागाचे पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

चौकटीत….
कोणत्याही प्रकारच्या भौतिक साधनांच्या जोरावर नाही, तर केवळ जिद्दीच्या व समर्पणाच्या भावनेतून यश प्राप्त करता येते. हा आदर्श सुरजने सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व सुविधा परिपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सुरजने ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारू शकतो हे त्याच्या कृतीतून दाखवून दिले आहे.
-मार्गदर्शक शिक्षक संदीप दिलीप चव्हाण,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *