
विकासाचा आराखडा बनविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत करणार…
कोपरगाव प्रतिनिधी:- ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक वारसा लाभलेल्या आणि सहकार चळवळीला नवी दिशा देणाऱ्या कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या विकासाला खिळ बसली आहे. आगामी काळात तालुक्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी भविष्याचा वेध घेत कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्याचे ठरवले आहे.
युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले की, कोपरगाव शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याची माझी भूमिका स्पष्ट आहे. कोपरगाव शहराच्या आणि तालुक्याच्या ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. तरुणाईकडे देखील विकासाच्या नवनवीन संकल्पना आहेत. या संकल्पनेतील विकास प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तरुणांचा तसेच समाजातील सर्व घटकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक थोर साधू, संत, महंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला कोपरगाव तालुका इतिहासाने, परंपरेने खूप श्रीमंत असला, आपल्याकडे चांगली निसर्गसंपत्ती असली आणि थोरा-मोठ्यांचा वारसा आपल्याला असला तरी आपण काही पैशाने, संसाधनाने फार श्रीमंत, संपन्न नाही. त्यामुळे कमी पैशात, मर्यादित साधनांमध्ये आपल्याला प्रगती कशी साधता येईल याचा विचार करावा लागेल. त्यासाठी आपल्याला आपला प्राधान्यक्रम आणि विकासाची दिशा या आराखड्याच्या निमित्ताने ठरवता येईल. सर्व क्षेत्रातील विकासाचे व्हिजन डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याची गरज आहे.
दूरगामी नियोजन व सर्वंकष विकासाचा आराखडा तयार करणे आवश्यक
विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, कोपरगाव शहराच्या आणि तालुक्याच्या विकासाला मोठा वाव आहे; पण गेल्या काही दिवसांपासून तालुक्याचा विकास खुंटला आहे. कोपरगाव शहर आणि तालुक्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दूरगामी नियोजन करून सर्वंकष विकासाचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी मोठे काम आपल्याला करावयाचे आहे. शहरात आणि तालुक्यात रस्ते, गटारी, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्याची सुविधा, घरकुल योजना, औद्योगिक विकास भयासह अनेक विषयांवर सखोल चर्चा आणि समीक्षा करून विकास करावा लागणार आहे. त्यासाठी कोपरगावच्या ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट’ तयार करणे गरजेचे आहे. कोपरगावचा पुढील २५-३० वर्षांत सर्वांगीण विकास कसा करता येईल, याच्या अभिनव संकल्पना या ब्ल्यू प्रिंटमध्ये असतील. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज या मूलभूत गरजांची पूर्तता, पाण्याचे नियोजन, दळणवळणाची सुविधा, दर्जेदार जीवनमान, सार्वजनिक स्वच्छता, उद्याने, क्रीडांगण, प्राथमिक व उच्च शिक्षण, व्यवसाय शिक्षण, रोजगार, कृषी, पर्यटन, साहित्य, कला, क्रीडा, पर्यावरण, सक्षम स्थानिक प्रशासन, औद्योगिक धोरण, शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध सुविधा, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेजलाईनचे जे पाणी गोदावरी नदीत मिसळते तेथे सांडपाणी प्रकल्प उभारणी अशा विविध विकास कामात लोकसहभाग या व अशा अनेक विषयांवर सखोल अभ्यास करून त्यावरील कृती योजना आम्ही या विकास आराखड्यातून मांडणार आहोत. आपण सर्वांनी मिळून एक प्रगत आणि संपन्न कोपरगावचे स्वप्न साकार करावयाचे आहे. त्यासाठी हा कोपरगावचा विकास आराखडा आम्ही तयार करणार आहोत. हा आराखडा कुण्या एका व्यक्तीचा, एका पक्षाचा नाही. तो आम्ही बनवत असलो तरी तो पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे.
पाणीपुरवठा योजनेत आमूलाग्र सुधारणा आवश्यक
एकेकाळचा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेला आणि उज्ज्वल इतिहास, परंपरा लाभलेला कोपरगाव तालुका आज अधोगतीच्या मार्गावर आहे. कोपरगाव तालुक्यातील पाणी, रस्ते, आरोग्य यासारखे अनेक प्रश्न आज गंभीर बनले आहेत. शहर आणि तालुक्यात सध्या कुठल्याच क्षेत्रात काही नवीन घडताना दिसत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या प्रयोगांना बळ मिळण्याऐवजी ते आज त्यांच्या अस्तित्वासाठीच धडपडताना दिसत आहेत. कोपरगावच्या विकासाला खिळ बसली आहे. विकासकामे केवळ कागदोपत्री दिसत आहेत. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी कमी पडतेय. कोपरगावच्या हक्काचे पाणी इतरत्र वळवले जात आहे. दररोज शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, अशी कोपरगाव शहरवासीयांची मागणी आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. कोपरगावची बाजारपेठ आज भकास झाली आहे. तिला गतवैभव मिळवून देण्यासाठी सुधारणांची गरज आहे.
आपल्याला प्रगतीच्या मार्गावर जायचे असेल तर ही परिस्थिती आपल्याला बदलावीच लागेल. पाणीपुरवठा योजनांच्या नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन या महत्वाच्या टप्प्यांमध्ये स्थानिक जनतेच्या सहभागाचा अभाव, पर्जन्यमानात असणारी विषमता, अनियमित पाऊस, पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीकडे केले जाणारे दुर्लक्ष, शासकीय यंत्रणेची उदासीनता या सर्व कारणांमुळे शहरात व तालुक्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता वाढत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता जनतेला शुध्द, पुरेसा, सुरक्षित व शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वसमावेशक योजनांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. पाण्याच्या कोणत्याही एकाच स्त्रोतावर अवलंबून न राहता विविध स्त्रोतांचा विचार करून सर्वसमावेशक उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. शहराचा विकास नियोजनबध्द पध्दतीने केल्यास नवीन विकसित होणार्या भागांत आवश्यक त्या क्षमतेच्या जलवाहिन्या टाकण्याची गरज आहे. तसेच सर्व नागरिकांना व्यवस्थित व मुबलक पाणी मिळण्यासाठी वितरण व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे, असे विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.
पुरातन वास्तू, धार्मिक स्थळांची रेलचेल, महामार्गांचे जाळे
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोपरगाव तालुका हा प्राचीन काळापासून दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. ‘दक्षिण गंगा’ गोदावरी नदी याच परिसरातून वाहते. प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी, तपस्वी, साधू-संतांनी गोदावरीकाठी तटी यज्ञ, तपश्चर्या, ध्यानधारणा केलेली आहे. तालुक्याच्या पंचक्रोशीत अनेक धार्मिक स्थळांची रेलचेल आहे. कोपरगावला राघोबाबादादा पेशव्यांचा प्राचीन राजवाडा आहे. या परिसरात अनेक पुरातन वास्तू आहेत. येथे श्री साईबाबा तपोभूमी मंदिर आहे. जवळच बेट भागात दैत्यगुरू शुक्राचार्य यांचे भारतातील एकमेव मंदिर आहे. राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचे समाधी मंदिर आहे. येथून जवळच शिर्डी येथे जगविख्यात श्री साईबाबा समाधी मंदिर आहे. कोकमठाण शिवारात आत्मा मालिक ध्यानपीठ व शैक्षणिक गुरुकुल आहे. कोपरगावातून नगर-मनमाड महामार्ग गेला असून, मनमाड-दौंड रेल्वेमार्गावरील कोपरगाव हे दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे प्रमुख शहर आहे. नागपूर-मुंबई एक्सप्रेस हायवेसह तालुक्यातील दहा गावांतून समृद्धी महामार्ग गेला असून,या महामार्गासोबतच सुरत-चेन्नई-विशाखापट्टणम या महामार्गाची निर्मिती सध्या सुरू आहे. या महामार्गामुळे भविष्यात कोपरगाव तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोपरगाव तालुक्यातील काकड़ी येथे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले असून, शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा ओघ कोपरगावकडे वळवल्यास या परिसराच्या प्रगतीला मोठा हातभार लागू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार
विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात सहकारी साखर कारखाने, बँका, पतसंस्था, दूध संघ व इतर सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरले आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९६० च्या दशकात मुहूर्तमेढ रोवलेल्या पूर्वीच्या संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखान्याने (आताचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना) प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडून देशात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या संजीवनी उद्योग समूहाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले असून, अनेकांना रोजगार मिळाला आहे.
शैक्षणिक संस्थांचे जाळे
कोपरगावात मोठे ‘शैक्षणिक हब’ आहे. संजीवनी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सैनिकी स्कूल, आयुर्वेद महाविद्यालय, रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, सोमैय्या उद्योग समूहाचे के, जे. सोमैय्या कॉलेज, समता इंटरनॅशनल स्कूल अशा विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे तालुक्यात पसरलेले आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून सहजानंद्नगर येथे उभारण्यात आलेल्या बीपीओ कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध झाला आहे. संजीवनी उद्योग समूहाच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमधून अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
निळवंडे धरणातून कोपरगावपर्यंत पाणी आणण्याच्या योजनेला गती देण्याची गरज कोपरगाव शहराला नाशिकच्या दारणा धरणातून गोदावरी डावा कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील शेतीलाही याच कालव्यातून पाणी दिले जाते. मात्र, अनियमित पाऊस, धरणातील पाण्याचे सिंचन व बिगरसिंचनासाठीचे वाढते आरक्षण, जीर्ण झालेले कालवे, घटलेली वाहन क्षमता, अनिश्चित आवर्तन, दूषित पाणीपुरवठा, सदोष पाणी वितरण व्यवस्था, वाढता खर्च आदि कारणांमुळे सध्याची पाणीपुरवठा योजना अव्यवहार्य आणि निरुपयोगी ठरत चालली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे कोपरगावपर्यंत पाणी आणण्याच्या योजनेला गती देण्याची आज नितांत गरज आहे. ही पाणीपुरवठा योजना लवकर मार्गी लागल्यास कमी खर्चात कोपरगावकरांना नियमित शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करता येऊ शकेल.
देशात आणि राज्यात सध्या भाजपचे सरकार सत्तेत आहे. या सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहर आणि तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवून विकासाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. भविष्यकाळाचा वेध घेत दूरगामी नियोजन, प्रखर इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आणि राजकारण बाजूला ठेवून सामूहिक प्रयत्न केले तर कोपरगाव शहर आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा मला विश्वास आहे. त्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.
