संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संजीवनी थाॅट लीडर्स कार्यक्रमाचे आयोजन...
कोपरगांव प्रतिनिधी:-
पुर्वीच्या काळी एकाद्या विषया संदर्भात माहिती मिळविण्यासाठी संबंधित पुस्तक अथवा जाणकाराशिवाय पर्याय नसायचा. परंतु सध्या इंटरनेटने क्रांती केली असुन अगोदर ध्येय ठरवुन ते प्राप्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. जीवनात यशस्वी होण्यासाठी मिशन (दृष्टी) आणि पॅशन (उत्कटता) आवश्यक आहे, असे प्रतिपादन विसेन ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष श्री सुभाकर रेड्डी कुर्ली यांनी केले.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभागाने आयोजीत केलेल्या ‘संजीवनी थाॅट लीडर्स’ या साखळी पध्दतीने घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमात सुभाकर रेड्डी कुर्ली बोलत होते. संजीवनी थाॅट लीडर्स हे यशस्वी उद्योजकांकडून विध्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. यामुळे उद्योग आणि शैक्षणिक यांच्यातील अंतर कमी होते व त्यामुळे विध्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळते. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेंजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी भुषविले. यावेळी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर व कार्पोरेट रिलेशन्सचे प्रमुख श्री इम्राण शेख व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी डाॅ. ठाकुर यांनी सर्वांचे स्वागत करून विध्यार्थ्यांना उद्योग जगताची ओळख तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कसे उपक्रम राबविले जातात, हे स्पष्ट केले. उद्योजक श्री सुभाकर यांची ओळख करून देताना सांगीतले की त्यांनी चांगली नोकरी असताना देखिल २००० साली विसेन ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना केली.विसेन ही अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, मशीन लर्निंग, बिग डेटा, क्लाउड मोबिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील सोल्युशन प्रदाता कंपनी असुन या कंपनीचे जाळे संपुर्ण जगभर आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री कोल्हे म्हणाले की श्री सुभाकर यांनी काळानुरूप स्वतःला बदलुन आपल्या व्यवसायाची व्याप्ती जगभर वाढविली, ही बाब सर्वांना प्रेरणादायी आहे.
श्री सुभाकर पुढे म्हणाले की मी माझ्या आयुष्याचे ध्येय महाविद्यालयीन जीवनापासुनच ठरविले होते. यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथेने मला प्रेरीत केले. अनुभवासाठी मी सुरूवातीला टीसीएस कंपनीत नोकरी केली व नंतर राजीनामा दिला.मोठ्या धाडसाने विसेन ही कंपनी सुरू केली. अवघ्या चार सहकार्यांना बरोबर घेवुन सुरू केलेल्या कंपनीची व्याप्ती वाढल्यामुळे आज ५००० लोक देश परदेशात कार्यरत आहेत. संकटे येतात, परंतु त्याच संकटांमधुन मार्ग मिळतो. पुर्वी मिळणाऱ्या संधीसाठी मर्यादीत क्षेत्र व शहरे होती. आज संधींसाठी सर्व जग खुले झाले आहे. मिशन आणि पॅशन अंगिकारले तर ध्येयापर्यंत जाण्यासाठी कोणीही थांबवु शकत नाही. भविष्यात यशस्वी होण्यासाठी मैत्रीचे जाळे घट्ट करा. संजीवनी महाविद्यालय जरी ग्रामिण भागामध्ये असले तरी आपले विध्यार्थी कोणत्याच क्षेत्रात मागे पडू नये यासाठी व्यवस्थापन सर्व उपक्रम येथे राबवित आहेे. विशेष म्हणजे येथे एसएपी चे अधिकृत केंद्र आहे, ही विध्यार्थ्यांसाठी खुप महत्वपुर्ण बाब आहे. भविष्यात विध्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी आमच्या कंपनी मार्फत संजीवनीला प्रथम प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणाही श्री सुभाकर यांनी केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही श्री सुभाकर यांनी दिली. तसेच भविष्यातही संपर्क साधान्याचे आवाहन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके यांनी आभार मानले.

फोटो ओळी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजीत संजीवनी थाॅट लीडर्स कार्यक्रमात उद्योजक सुभाकर रेड्डी कुर्ली विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना. यावेळी श्री अमित कोल्हे, डाॅ. ठाकुर व डाॅ. क्षिरसागर व्यासपीठावर उपस्थित होते.
