सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांसाठी प्रशासन कटीबध्द:- प्रांतधिकारी गोविंद शिंदे…

कोपरगाव

राहाता तहसील मध्ये ‘अमृत जवान सन्मान दिन’ साजरा,,
23 एप्रिल 2022 पर्यंत राबविले जाणार अभियान…

सैनिकांचे प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा करणे या अभियानाचा उद्देश…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-
सैनिकांची प्रलंबित शासकीय कामांचा निपटारा करण्यासाठी अहमदनगर महसूल विभागाच्या वतीने ‘अमृत जवान सन्मान अभियान 2022’ राबविण्यात येत आहे. या अभियानात राहाता तहसील कार्यालयात ‘अमृत जवान सन्मान दिन’ साजरा करण्यात आला. शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
अमृत जवान सन्मान दिन कार्यक्रम प्रसंगी शिर्डी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, भूमी अभिलेख उपअधीक्षक नरेंद्र पाटील, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता नगरपरिषद मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण व तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी या अभियाना विषयी गोविंद शिंदे यांनी सांगितले की, सैनिकांचे विभागातील शासकीय कामे जलदरित्या व प्राधान्याने निपटारा करण्यासाठी 23 एप्रिल 2022 पर्यंत ‘अमृत जवान सन्मान अभियान 2022’ राबविण्यात येणार आहे. लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ घेतला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. सैनिकांचे विविध विभागाकडे प्रलंबित असलेले कामे करण्यासाठी तालुका प्रशासन कटीबध्द आहे.
पोलीस उपअधीक्षक संजय सातव म्हणाले, सैनिकांना गुन्हे व कायदेविषयक सहाय्यता व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जाईल. त्यांची पोलीस विभागाकडील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.


तालुका सहाय्यक कक्षाविषयी बोलतांना कुंदन हिरे म्हणाले, राहाता तालुक्यातील कोणत्या शासकीय विभागात सैनिकांची कामे प्रलंबित असतील. त्यांनी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सहाय्यता कक्षा शी संपर्क साधावा. या कक्षात दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत कार्यरत सैनिक, माजी सैनिक व त्यांचे निकटवर्तीय यांचे विविध विभागांकडील तक्रार अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. अर्जाचे विभागनिहाय वर्गीकरण करुन संबंधित विभागांकडे ते अर्ज त्याच दिवशी पाठवाण्यात येणार आहेत. या माध्यमातून शासनाच्या इतर सर्व विभागाकडे सैनिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा केला जाणार आहे.
या अभियानात तालुक्यातील महसूल, पोलीस, ग्रामविकास यासह सर्व शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदवावा. तसेच जास्तीत जास्त सैनिकांनी आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी अभियानात सहभाग नोंदवावा. असे आवाहन ही तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
सहाय्यता कक्षाच्या आजच्या बैठकीत संबंधित विभाग प्रमुख सैनिक अर्जदार यांचे उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेण्यात आला. सैनिकांचे विविध शासकीय विभागाकडील प्रलंबित कामांचे 13 अर्ज प्राप्त झाले. यावेळी तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सीस भारुड, उपाध्यक्ष प्रभाकर गीते, कार्याध्यक्ष सुनील देशमुख यांच्यासह बहुसंख्यने आजी, माजी सैनिक व शहीद सैनिकांचे कुटूंबातील नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *