Uncategorized

डॉ. नानासाहेब गायकवाड यांचा ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द गावचे भूमिपुत्र, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचरचे विद्यमान प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांचा रयत शिक्षण संस्थेच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मिळालेला हा सन्मान मढी खुर्दसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा पुढे नेत डॉ. गायकवाड यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. प्राचार्य म्हणून त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. शैक्षणिक, प्रशासकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची विशेष दखल घेण्यात आली.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणारा ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव करणारा असून, रयत शिक्षण संस्थेच्या मूल्याधिष्ठित शैक्षणिक परंपरेत त्यांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे. या पुरस्कारामुळे शैक्षणिक आणि सामाजिक लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. नानासाहेब गायकवाड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ. स्नेहलताताई कोल्हे,आमदार विवेकभैय्या कोल्हे तसेच नगराध्यक्ष पराग संधान यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी असून, भविष्यातही त्यांच्या हातून विद्यार्थी, शिक्षणसंस्था आणि समाजाच्या विकासासाठी अधिक भरीव कार्य घडावे, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

या सन्मानामुळे मढी खुर्दच्या भूमिपुत्राचा शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव झाला असून, ‘गावच्या मातीतून घडलेले कर्तृत्व, शिक्षणाच्या क्षेत्रात उमटवते अमीट ठसा’ अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *