
कोपरगाव प्रतिनिधी:-
समाजात वावरताना अनेक प्रकारच्या वृत्ती, प्रवृत्ती दिसून येतात. अनेक संस्कृती विकृती प्रकृती दिसतात. मुलं जन्माला आल्यानंतर घरात आई वडील संस्कार करतात, शाळेत शिक्षक मित्र मंडळ संस्कार करतात तर समाजात वावरताना सामाजिक सांस्कृतिक संस्कार होत असतात. असे असले तरी पण कधीतरी कुठेतरी काहीतरी चुकभुल होते. सुसंस्कृत होण्याऐवजी विकृती वाढत जाते. अनावधानाने हातून नकळत एखादि चुक घडते आणि दुर्दैवाने आयुष्याचे वळण बदलून जाते. विकृत समाजाला, स्वैराचारी दुराचारी समाजाला वळण लावण्यासाठी संत आणि पोलीस काम करतात. संतांची भाषा गोडीगुलाबीची, संस्कारमय असते तर पोलीसांची भाषा दंडुकयाची असते. एकंदरीत,’ लातोंके भुत बातोसे नहि मानते ‘ . समाजातील सर्व भल्या बुरया घटना प्रसंग वर्तमानपत्रातून समाजासमोर येत असतात. वर्तमानपत्र समाजमनाचा आरसा असतो. कोणतीही सामाजिक घटना, दुर्घटना, आणि आपत्तीजनक परिस्थिती वर्तमानपत्रातून येत असताना एखादे ‘ छायाचित्र ‘ खूप काही सांगून जाते. हजार शब्द एकाच छायाचित्रातून बोलक्या होतात. घटनेचे गांभीर्य वा सामाजिक संकेत छायाचित्रातून व्यक्त होतो. प्रतिनिधी/ वार्ताहर कडून आलेल्या बातम्या संपादक संस्कारीत करतात. बातमीची शहानिशा, सत्यता पडताळून बातम्या प्रसारित करण्यात येतात. अनेक वर्तमानपत्रांत वाचकांच्या प्रतिक्रिया, मनातील भावना, सामाजिक घटना येत असतात. एकंदरीत संत – पोलीस – वर्तमानपत्र – छायाचित्र समाजातील कृती विकृती आरशाप्रमाणे मांडताना दिसतात. मराठीतले पहिले वर्तमानपत्र ‘ दर्पण ‘ बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तरवडी येथे पहिले साप्ताहिक सुरू झाले होते. आज अनेक वर्तमानपत्र असली तरी ठराविक लोकमानसात आपले स्थान टिकवून आहेत. अनेक आवृत्त्या प्रकाशित होत आहेत.
सार्वमत वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात संत पोलीस संपादक व्यवस्थापक छायाचित्रकार प्रतिनिधी वार्ताहर समाजातील अनेक नामवंत गुणवंत मान्यवर उपस्थित राहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. संत महंतांनी आशिर्वाद दिला.
