पृथ्वीवरील ‘प्लास्टिक’च्या प्रतिबंधासाठी प्रत्येकानं ‘पर्यावरण दूत’ व्हावे:- गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे…

Uncategorized

‘अहमदनगर’ च्या केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने पुणतांबा येथे ‘ प्लास्टिक बंदी व पर्यावरण ‘ या विषयावर जनजागृती…
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- “एकल वापर प्लास्टिकच्या (सिंगल युज प्लास्टिक) सार्वजनिक वापरास शासनाने बंदी आणली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाचं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यासाठी नागरिकांनी पृथ्वी वाचविण्यासाठी पर्यावरण दूत होऊन काम करावं.” असे आवाहन राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी आज येथे केले आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अहमदनगर येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त ‘ प्लास्टिक बंदी व पर्यावरण ‘ या विषयावर पुणतांबा येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला आहे‌.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘केंद्रीय संचार ब्यूरो’ चे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी फनीकुमार, पुणतांबाचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे, माहिती अधिकारी सुरेश पाटील, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे, रूरल हायस्कूचे मुख्याध्यापक अशोक ओहोळ, माजी सैनिक बाळासाहेब सांगळे, शिवाजी वाघमारे, कोपरगांवच्या सुर्यतेज फौंडेशनचे अध्यक्ष सुशांत घोडके, सदस्या लता भामरे व सामाजिक कार्यकर्ते माधव ओझा आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी श्री.शेवाळे म्हणाले, पर्यावरण हा शालेय विद्यार्थ्यांनी गांर्भीयपूर्वक शिकण्याचा विषय आहे. प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे सजीवसृष्टी अपरिमित हानी होत आहे. यासाठी प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांनी या विषयावर आपल्या घरी पालकांची जागृती करावी. ‘ प्लास्टिक ‘ पासून बनविल्या वस्तूंचा वापर न करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. आज देशपातळीवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने शासनाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा. यासाठी प्रत्येकाला ग्रामपंचायत कार्यालयातून तिरंगा झेंडा उपलब्ध करून दिला जाईल.


श्री.माधव जायभाये म्हणाले, प्लास्टिक मुळे होणारी पर्यावरण हानी हा केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमातील विषय आहे. यासाठी शासनाने कडक पावले उचलेली आहेत. १ जूलै २०२२ पासून देशभर सिंगल यूज प्लास्टिक च्या १९ प्रकारांवर संपूर्णत: बंदी घातली आहे.
सरपंच डॉ.धनजंय धनवटे म्हणाले, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पुणतांबा ग्रामपंचायतीने लोकसहभागातून एक लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. यातील ९० हजार वृक्ष आतापर्यंत लावण्यात आली आहेत. उर्वरित वृक्षांची लवकरच लागवड करण्यात येईल.

          केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगरच्या वतीने कोपरगांवच्या सुर्यतेज फौंडेशनच्या सहकार्याने 'प्लास्टिक व पर्यावरण' या विषयावर निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील तीन्ही प्रकारातील पहिल्या पाच पुरस्कार्थी विद्यार्थी-विद्यार्थींनीना उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिस वाटप करण्यात आले. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कामकाज पाहिले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात पाच वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना पुणतांब्याचे दिवंगत भुमीपुत्र संगीतरचनाकार सी.रामचंद्र चितळकर, भुमीपुत्र अप्पासाहेब धनवटे, रामदयाल ओझा, वसंतराव वहाडणे, गंगाधर धर्माधिकारी यांची नावे देवून त्यांचे पालकत्व विद्यार्थ्यांना देण्यात आले.यावेळी पर्यावरण जनजागरण रॅली काढण्यात आली. सूत्रसंचालन कल्पना भांगरे व महेश घुले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *