वारीतील माजी विद्यार्थ्याने शाळेला दिली दहा किलोची पितळी घंटा भेट..!

Uncategorized

जिल्हा परिषद शाळा : पुरोहित माधव जोशी यांनी शाळेप्रती दाखविले दातृत्व..!
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थी तथा पंचक्रोषितील जेष्ठ पुरोहित माधव जोशी यांनी आपल्या शाळेप्रतीच्या दातृत्वातून शाळेला १० किलो वजनाची पितळी घंटा शनिवारी (दि.१६) भेट दिली असून शाळा व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केली आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेने ‘मिशन आपुलकी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत माजी विद्यार्थ्यांसह विविध उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक व दानशूर व्यक्तींना शाळांसाठी भौतिक साहित्य देण्यासाठी प्रेरीत केले जात आहे. त्यानुसार मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीने गावातील अशा व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याला तत्काळ प्रतिसाद देत पुरोहित माधव जोशी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मुकुंद जोशी, केशव जोशी या कुटुंबीयांनी दातृत्वातून हि मदत दिली आहे.
यावेळी पुरोहित माधव जोशी म्हणाले, मी याच जिल्हा परिषद शाळेत ६० वर्षापूर्वी शिक्षण घेतले आहे. माझ्या मुलांचे देखील याच शाळेत शिक्षण झाले आणि आता माझे नातू देखील याच शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळेला काही तरी देण्याची माझी इच्छा होती. शाळेत गेल्यानंतर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी देण्यात येणारी घंटा नसल्याचे लक्षात आले. त्यानुसार हि पितळी घंटा दिली आहे. याचा खरच खूप आनंद होतो आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा दिपाली बनभेरू, जेष्ठ सदस्य प्रकाश गोर्डे, परसराम टेके, भानुदास खवले, मुकुंद जोशी, दीपिका वाघ, अश्विनी महिरे, भारती गहिरे, शालिनी कर्पे, मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, गोविंदा पोरे, पांडुरंग खाडे, पत्रकार रोहित टेके यांच्यासह महिला, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटोओळी:-
माजी विद्यार्थी पुरोहित माधव जोशी यांनी शाळा व्यवस्थापन समितीकडे घंटा सुपूर्द केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *