
कोपरगाव प्रतिनीधी:-
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा पगडा असलेल्या स्व एकनाथ सोनाजी खरात यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात आपली नोकरी सांभाळत असताना विविध सामाजिक शैक्षणिक चळवळीत भाग घेऊन समाज हितासाठी काम केले. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी प्रा. डॉ. धर्माजी खरात यांनी ‘बाप नावाचं वादळ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. आपल्या मुलांना घडवण्यासाठी आईबरोबरच बाप महत्त्वाची भूमिका बजावत असतो मात्र हा बाप प्रत्येक वेळी उपेक्षित असतो. मात्र डॉ. खरात यांनी ‘बाप नावाचं वादळ’ प्रसिद्ध करून बापाची भूमिका कशी महत्त्वाची असते हे आपल्या काव्य संग्रहातून सांगितले. ‘बाप नावाचं वादळ’ ही बाप सांभाळण्याची एक सामाजिक चळवळच त्यांनी उभी केली. निश्चितच नवीन पिढीला हे ‘बाप नावाचं वादळ’ प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
खरात कुटुंबिया सोबत कोल्हे कुटुंबाचे अतुट असं नातं आहे. यापुढेही भविष्यात कोल्हे परिवार सदैव आपल्या पाठीशी राहील असं कोल्हेताई यांनी खरात कुटुंबियांना आश्वसित केले.त्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे राज्यस्तरीय महाकवी संमेलनात बोलत होत्या.
बाप नावाचं वादळ’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय बाप नावाचं वादळ महाकवी संमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ व्ही एन मगरे होते.
याप्रसंगी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई सातभाई, संजय सातभाई, डॉ गोरक्षनाथ रोकडे, सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, राज्यकर उपयुक्त दिलीप झाल्टे, सरपंच संजय गुरसळ, डॉ सुभाष रणधीर, कल्याण होन ,प्रभाकर होन ,भाऊसाहेब होन ,सौ संध्या गायकवाड, पंडित भारुड, सौ संगीता सोनवणे, रंजीत खरात, उज्वला कांबळे, संजय खरात, बाळासाहेब देवकर, ज्ञानेश्वर शिंदे, अरुण खरात आदी सह महाराष्ट्रभरातून आलेले कवी, लेखक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. धर्माजी खरात यांनी ‘बाप नावाचं वादळ’ या कवितासंग्रहाचा उद्देश विशद केला. बाप सांभाळण्याची सामाजिक चळवळ सुरू केली असून आयुष्यभर कष्ट करणारा बाप शेवटच्या क्षणी वृध्दआश्रमात टाकण्याचे पाप त्यांची मुले करतात. संस्कृती व सामाजिक बांधिलकी टिकण्यासाठी ज्या आईबापांनी आपल्याला घडविले, त्याच आई बापावर वृद्धाश्रम जाण्याच वेळ येऊ नये म्हणून या पुस्तकातून प्रबोधन केले आहे. ज्या मुलांना वृद्ध आईबाप नकोशे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा वृद्ध त्या माता-पित्यांचा आधार ही सामाजिक चळवळ बनेल असे त्यांनी सांगितले. कुलगुरू व्ही एन मगरे, राजेश परजणे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई सातभाई, सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे, डॉ गोरक्षनाथ रोकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कविसंमेलनात शंभरहून अधिक कवि ,कवयित्री यांनी सहभाग घेतला होता. स्व. एकनाथ सोनाजी खरात यांच्या पुतळ्याचे अनावरण व त्यांच्या स्मरणार्थ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते विविध वृक्षांचे रोपण चांदेकसारे येथे करण्यात आले. या कविसंमेलनात सहभागी झालेल्या कवी लेखक यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या गायकवाड व पंडित भारूड यांनी केले तर रणजित खरात यांनी आभार मानले.
