कोळगांवथडी व सांगवीभूसार परिसरातील बेकायदा वाळू उपसा त्वरीत थांबवा:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील मौजे कोळगांवथडी व सांगवीभूसार तसेच अन्य हददीतुन मोठया प्रमाणांत बेकायदा ट्रॅक्टर व अन्य वाहनाच्या माध्यमातुन वाळुचा दिवस रात्र उपसा सुरू आहे त्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत चालले आहे तरी हा बेकायदा वाळू उपसा तातडीने थांबवावा अन्यथा त्याविरूध्द आम्हांस नाईलाजास्तव रस्त्यावर येवुन संघर्ष करावा लागेल असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गोदापात्रातुन कोळगांवथडी व सांगवीभूसार येथुन मोठया प्रमाणात पोकलॅन मशीन व जेसीबीच्या सहाययाने वाळू उपसा होतो याबाबत संबंधीत कार्यान्वयीन यंत्रणेकडे अनेकवेळा माहिती देवूनही त्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. गोदा पात्रातील अन्य ठिकाणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा होत आहे.
सध्या दिवस रात्र चालणा-या वाळू उपशामुळे गोदाकाठावरील शेती क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, गोदा काठच्या विहीरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. परिणामी त्यावर अवलंबुन असलेल्या वैरण घास आदि पिके पाण्याअभावी वाळून चालले आहे. जनावरांना हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. शेतक-यांचे शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान होत आहे.
सर्वप्रकारचे नियम धाब्यावर बसवुन सध्या हा वाळू उपसा सुरू असल्याने तो पर्यावरणास घातक ठरत आहे, पोलिसासह संबंधीत यंत्रणा फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, बेकायदा यंत्र सामुग्रीच्या माध्यमांतुन वाळू उपसा होत असुननही त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही, या वाळू उपशामुळे शासनाचा महसुल देखील बुडत आहे. या वाळु साठयांचे लिलाव प्रक्रिया न झाल्याने दिवसा ढवळया वाळू तस्कर शासनाच्या मालमत्तेवर डल्ला मारून स्वतःच्या तुंबडया भरत आहेत परिणामी त्यातुन नको त्या बेकायदा इतर उद्योगांना खतपाणी घातले जात आहे.
वाळू तस्करीतुन सर्वसामान्य माणसांना त्याचा त्रास होत आहे, वाळू तस्करांची मुजोरी आणि दशहत वाढत असल्याने येथील रहिवासी जाहिरपणे तक्रार देण्यास पुढे येत नाही, त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेकायदा वाळु वाहतुकीमुळे सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे, खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढुन त्यात अनेक निरपराध व्यक्तींचे प्राण गेले आहेत, वाळू उपशावर निर्बंध नसल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जीवनमानावर होत आहे, तेंव्हा या वाळू उपशाला तात्काळ आळा घालावा असेही विवेकभैय्या कोल्हे शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *