
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत तालुक्यातील मेघना कैलास दरेकर हिनं घवघवीत यश संपादन केलं आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून तिची उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग-1) पदी निवड झाली आहे. येसगाव पंचक्रोशीतून क्लास-वन अधिकारी होणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे. मेघना ही येसगाव येथील रहिवाशी कैलास दरेकर आणि जयश्री दरकेर यांची कन्या आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, आई-वडिलांचं पाठबळ आणि स्वयंअध्ययनावर भर या त्रिसूत्रीच्या जोरावर मेघनानं यशाचा झेंडाचा रोवला आहे.
मेघना हिने माध्यमिक शिक्षण संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथून पूर्ण केले. इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण एसएसजीएम महाविद्यालयातून घेतले. अभियांत्रिकी शाखेची पदवी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पदव्युत्तर अभियांत्रिकीची (एम.ई) पदवी के.के.वाघ महाविद्यालयातून घेतली. पदवी काळातच मेघना हिने स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अभियांत्रिकी सेवा परीक्षा घेतली जाते. राज्यातील लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. पूर्व, मुख्य आणि मुलाखत तीन टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेत उमेदवारांच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो. मेघनाच्या यशाबद्दल संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनीचे चेअरमन बिपीन कोल्हे, विश्वस्त अमित कोल्हे, सुमित कोल्हे आदींनी तिच्या यशाबद्दल कौतुक केलं आहे.
