कोपरगाव तालुका साखर कामगार सभा अंतर्गत कारखाना कार्यस्थळावर शनिवारी सकाळी ११ वाजता शोकसभा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे या नावातच मोठा विचार असून त्यांनी प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत संजीवनीचे साम्राज्य उभे करत लाखो कुटूंबाचे पोशिंदे बनले, त्यांची विचारधारा सहयाद्रीपेक्षाही मोठी आहे, तेंव्हा त्यांची सामाजिक, आर्थीिक, विकासात्मक धोरणे पुढे चालु ठेवावी हिच त्यांच्या कार्याला खरी श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन माजी सभापती व खंडकरी चळवळीचे अभ्यासक मच्छिंद्र टेके यांनी केले.


सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन व संजीवनी उद्योग समुह, कोपरगांव तालुका साखर कामगार सभा अंतर्गत कारखाना कार्यस्थळावर शनिवारी सकाळी ११ वाजता शोकसभा घेण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे होते.
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांवच्या पंचक्रोशीत पाण्याच्या उपलब्धीसाठी प्रत्येक गावात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, दगडी साठवण बंधारे मातीचे बंधारे, शेततळी मोठ्या प्रमाणात बांधले असुन त्यात त्यांच्या अस्थींचे विसर्जन रविवारी (२० मार्च रोजी) करण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक विवेकदादा कोल्हे, अमृृता पवार यांच्या हस्ते अस्थी कलश वितरीत करण्यांत आले.
प्रारंभी कामगारनेते मनोहर शिंदे प्रास्तविक करतांना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे आणि कामगार ही कारखान्याची दोन महत्वाची चाक आहे, त्यांनी राज्य व देशपातळीवर कामगारांच्या हिताच्या असंख्य निर्णयप्रक्रिया राबवुन त्याची अंमलबजावणी केली, खंडकरी शेतक-यांच्या जमिनी सुटल्या पाहिजे यासाठी त्यांनी विसापुरचा तीन महिने कारावास पत्करला होता.
भाजपाचे प्रदेश सदस्य रविंद्र बोरावके याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांनी देश व राज्य पातळीवर आपल्या राजकीय कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला. आपल्या विद्यार्थी दशेपासून त्यांच्या १९७२ पासुनच्या सर्व निवडणुका अनुभवल्या. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सत्याग्रही शेतकरी या पुस्तकात आयूष्यातील सर्व घटनांची नोंद करून ठेवली असून त्यांचे आत्मचरित्र सर्वासाठी उदबोधक व प्रेरणादायी आहे. माजी सभापती मच्छिंद्र केकाण म्हणाले की, आपल्या सभापतीपदाच्या कार्यकाळात पिण्याच्या पाण्यांची भीषण टंचाई निर्माण झाली होती, त्यावरच्या उपाययोजना शंकरराव कोल्हे यांनी त्यांचे गुडघ्याची शस्त्रकिया झालेली असतानाही रूग्णालयातुनच केल्या, संजीवनी कारखान्याचे सर्व प्रकल्प बंद ठेवुन त्यांनी माणसांना व जनावारांना पिण्याचे पाणी पुरविले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात म्हणाले की, शंकरराव कोल्हे हे आमच्या राजकारणांतील बापमाणूस होते त्यांनीच आम्हाला घडविले. संचालक शिवाजीराव वक्ते म्हणाले की, ग्रामिण अर्थकारणाला दिशा देणारे संजीवनीचे वैभव शंकरराव कोल्हेंनी उभे करत त्यातुन अनेक संस्थांचे जाळे विणले, सहकाराचा परिसस्पर्श कोपरगाव मतदार संघाला त्यांच्या रूपाने मिळाला. संचालक अरूण येवले म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांनी आव्हानातुन जिदद सिध्द करून दाखवत लाखोंचे पोशिंदे झाले, समाजाच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा संघर्ष सुरू होता. संचालक प्रदिप नवले म्हणाले की, शंकरराव कोल्हे देहाने जरी अनंतात विलीन झाले पण कार्यातुन ते आपल्यात आहेत. भास्करराव तिरसे म्हणाले की, कार्यकर्ता छोटा असो की मोठा त्याच्या प्रत्येक अडचणी आपल्या समजून त्या सोडविण्यासाठी शंकरराव कोल्हे सतत पुढाकार घेत असत. पांडुरंगशास्त्री शिंदे म्हणाले की, भविष्याची जाण असलेले नेतृत्व म्हणजे शंकरराव कोल्हे होय, त्यांचा आणि आमचा २२ वर्षाचा सहवास तो शब्दात व्यतीत होवुच शकत नाही, कार्यकर्त्यांच्या जीवाला जीव देवुन समाजाच्या उन्नतीसाठी झटणा-यापैकी ते एक होते. भाउसाहेब वाघ व कैलास संवत्सरकर म्हणाले की, शिंगणापुरच्या कर्मभूमीत शंकरराव कोल्हेंची चिरनिद्रा आहे याचा आम्हांला अभिमान आहे. जिल्हयाच्या प्रत्येक घडामोडीत त्यांचे स्थान उज्वल होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांनी भान ठेवुन योजना आखल्या आणि बेभान होवुन त्या यशस्वी केल्या. शेतक-यांच्या समस्यांचे निराकरणासाठी वेळप्रसंगी राज्यातील मुख्यमंत्री महोदयाची खुर्ची हलविण्याची ताकद त्यांच्यात होती. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष व माहेगांवदेशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे म्हणाले की, सुखात सगळेच साथ देत असतात पण दुःख आल्यावर कुणी विचारत नाही मात्र शंकरराव कोल्हेचे व्यक्तीमत्व सुखात आणि दुःखात साथ देणारे होते.
याप्रसंगी सर्वश्री बबनराव निकम, बालमभाई इनामदार, एल. डी. पानगव्हाणे, त्रंबकराव सरोदे, वाल्मीकराव भिंगारे, विलास कुलकर्णी, राजेंद्र पाटणकर, सुधाकर गाढवे, विजय भडकवाडे, एस. एन. पवार, चंद्रकांत देवकर, डब्ल्यु. आर. आहेर, सोपानराव कासार, नारायण अग्रवाल, अशोक नरोडे, दिपक चौधरी आदिंनी श्रध्दांजली वाहिली.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. सोपानराव पानगव्हाणे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब संधान, विश्वासराव महाले, अशोकराव औताडे, बाळासाहेब नरोडे, बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव बारहाते, त्र्यंबकराव परजणे, मनेष गाडे, साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, विजय आढाव, राजेंद्र सोनवणे, विजय वाजे, शहराध्यक्ष दत्ता काले, स्वप्नील निखाडे, विवेक सोनवणे, रविंद्र रोहमारे, सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी पसायदान म्हटले.

फोटोओळी:-कोपरगांव
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांवच्या पंचकोशीत पाण्याच्या उपलब्धीसाठी असंख्य बंधारे बांधले असुन त्यात त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्याहस्ते अस्थी कलश वितरीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *