के. जे. सोमैया महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन संपन्न…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे, धर्माचे या प्रांताचे आदर्श नाहीत तर ते संपूर्ण भारत देशाचे व जगाचे आदर्श आहेत. कारण शहीद भगतसिंगांना स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांपासून मिळाली. राशियामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेचे शिवचरित्रावरचे भाषण ऐकूण एका रशियन प्राध्यापकाला शिवचरित्र लिहीण्याची प्रेरणा मिळाली. क्युवाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांना अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला पराभूत करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांपासून मिळाली. जपानी लोकनेता मुलागानीनचे आदर्श शिवाजी महाराज होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे प्रेरणा स्थान शिवाजी महाराजच होते. तर पंजाबचा सिंह लाला लाजपतराय यांनी उर्दू भाषेत शिवचरित्र लिहून स्वातंत्र्य आंदोलनात जीवन समर्पित केले. अशो शेकडो उदहारणे देता येतील. शिवाजी महाराजापासून प्रेरणा घेऊन देशात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची सुख्यात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हे समजाऊन घेऊन छत्रपतींचा इतिहास जसा ढाल तलवारीचा इतिहास आहे तसाच परिवर्तनाचाही इतिहास आहे.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक व व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये ‘धर्मनिरपेक्ष जाणता राजा शिवछत्रपती ‘विषयावर आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी कोपरगांव तालुका एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे हे होते.

या उदघाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप करतांना श्री. अशोकराव रोहमारे म्हणाले की, आपल्या महाविद्यालयास नॅक (बंगलूर) ने ‘अ’ श्रेणी मानांकन दिले आहे व पुणे विद्यापीठाने उत्कृष्ठ महाविद्यालय म्हणून आपला यथोचित सन्मान ,केला आहे. या सर्व बाची आपल्या विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांची गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या असल्या तरी ही गुणवत्ता टिकविणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण मागील सात वर्षांपासून माजी आमदार के.के.बी. रोहमारे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. या स्पर्धेसाठी ‘धर्मनिरपेक्ष जाणता राजा शिवछत्रपती’ हा एकमेव विषय जाणीवपूर्वक निश्चित करण्यात आला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण करणान्या आणि दिशाभूल करणाऱ्या ढोंगी राजकारण्यांपासून जनतेने सावध झाले पाहिजे व शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजाऊन घेऊन प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे हा उदात्त हेतू यापाठीमागे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मी त्यासाठी शुभेच्छा देतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक डॉ. जे.एस.मोरे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी केले. सहसंयोजक प्रा. विजय ठाणगे यांनी प्रमुख अतिथी व परिक्षकांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमास मा. रावसाहेब रोहमारे, संस्थेचे संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे, अॅड. राहुल रोहमारे, सुधीर डागा, अॅड. संजय भोकरे, आदी मान्यवर, पत्रकार व महाराष्ट्रातील कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, नांदेड, मुंबई, औरंगाबाद, पुणे आदी विभिन्न महाविद्यालयातील स्पर्धक संघ व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक प्रो. डॉ. शांताराम चौधरी, डॉ. बाळासाहेब औताडे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. अशोक सुर्यवंशी यांनी केले व शेवटी डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

उद्घाटन सत्र संपल्यानंतर लगेचच स्पर्धा सुरू करण्यात आली. स्पर्धक संख्या पन्नास पेक्षा जास्त असल्याने पाच वाजेपर्यंत स्पर्धा सुरू ठेऊन उर्वरित स्पर्धकांची भाषणे दुसऱ्या दिवशी घेण्याची घोषणा स्पर्धा संयोजन समितीने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *