

कोपरगांव प्रतिनिधी:-
हिंदवी स्वराज्य आणि मराठी माणसाचा बाणा या दोन गोष्टींना बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर महत्व देत महाराष्ट्रीय अस्मिता जागविली, प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा पाया थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविला. राष्ट्रीय स्तरावर टिका टिप्पणीत बाळासाहेब व्यंगचित्राच्या माध्यमातून वाकबगार होते, त्यांचा एक कुंचला फिरला की भल्याभल्यांना त्याची जरब वाटायची असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेच्यावतीने भारतरत्न सुभाषचंद्र बोस यांची 125 वी तर हिंदवी हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 96 व्यi जयंती निमित्त विवेक कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी प्रास्ताविक केले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा या एकाच वाक्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तरुणाईला भुरळ घातली ही भारतवासियांसाठी मोठी प्रेरणा आहे, जयहिंद शब्दाला त्यांनी भारत देशाचा नारा बनविला, वकृत्व विचारधारेवर त्यांनी स्वातंत्र्याचे सवंगडी मिळवले, इंग्रज भारतीयांना सतत दुषणे देत म्हणून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास घडवत मोलाची कामगिरी केली.
तर श्री बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावर 56 वर्षापूर्वी 1966 मध्ये शिवसेनेचा पाया घातला, स्पष्टवक्तेपणा, मराठी बाणा याबाबतची वकृत्व विचारधारा सडेतोडपणे मांडत नेहमी राज्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्राची मान कशी उंचावेल हाच प्रयत्न त्यांनी केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, अमृत संजीवनीचे पराग संधान,अतुल काले, प्रमोद लबडे,भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले,शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, निलेश धुमाळ, नारायण अग्रवाल, संचालक प्रदिप नवले, बाळासाहेब आढाव, गोपी गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता काले, पप्पु पडीयार, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी भाजपा-शिवसेना आजी-माजी नगरसेवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते, शेवटी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी आभार मानले.
