

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरासाठी अतिशय महत्वाचा असलेला पाच नं.साठवण तलाव व्हावा यासाठी सर्वप्रथम नगराध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे यांनी श्री.संजयजी काळे, नितीनजी शिंदे यांचेसह ऑक्टोबर 2018 मध्ये शिर्डी येथे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंपनी चे श्री.रेड्डी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर श्री.विजयराव वहाडणे यांनी दिल्ली येथे नोव्हेंबर 2018 मध्ये ना.नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेऊन कोपरगाव शहराची पाणी टंचाई कमी व्हावी यासाठी समृद्धीच्या माध्यमातून पाच नंबर साठवण तलावाचे खोदकाम करण्याची आवश्यकता पटवून दिली. त्यावेळी ना.नितीनजी गडकरी यांनी त्वरित हैदराबाद येथे फोनवर श्री.रेड्डी यांचेशी संपर्क करून पाच नं. साठवण तलावाचे खोदकाम करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नगराध्यक्ष श्री विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब, अभियंता वाघ साहेब, अभियंता श्रीमती पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत अनेक मिटिंग झाल्या. जमिनीतून माती-मुरूम-दगडाचे नमुने घेण्यात येऊन गायत्री कंपनी ने खोदकाम करून माती-मुरूम वाहून न्यायला सुरुवातही केली. पण कोपरगावच्या दुर्दैवाने राजकिय अडथळे आणले गेल्याने काम मधेच थंडावले-बंद पडले.
मात्र त्यानंतर 2019 मध्ये श्री.आशुतोषजी काळे आमदार झाले व त्यांनी राज्य शासनातील संबंधांचा वापर करून पाच नं. साठवण तलावाच्या कामाला गती दिली.
नगराध्यक्ष श्री.विजयराव वहाडणे, अनुभवी व कार्यक्षम मुख्याधिकारी श्री.शांतारामजी गोसावी, यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित सर्व शासकिय विभाग-अधिकारी यांना सोबत घेऊन पाच नंबर साठवण तलाव कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. आता तर राज्य शासनाच्या प्रकल्प मान्यता समितीने 123 कोटी रू. निधीलाही मान्यता दिल्याने, पाच नं. साठवण तलाव व जलवितरण योजना पूर्ण होणार याची खात्री पटलेली आहे.
कालच आ.आशुतोषजी काळे, मुख्याधिकारी श्री.शांतारामजी गोसावी यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याचे कळविले आहे. काही निःस्वार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपापल्या परीने यासाठी हातभार लावला हेही मान्य करावे लागेल. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व आमदार यांच्यात समन्वय असेल तर विकासकामे वेगाने होतात याचा अनुभव यानिमित्ताने आला आहे.
