गोदावरी कालव्याच्या ओव्हरफलोच्या पाण्याने गांवतळी, बंधारे भरून द्यावे:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
सध्या गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी सोडण्यांत आले आहे तेंव्हा या पाण्याने कालवा लाभक्षेत्रातील गांवतळी, पिण्याचे पाण्यांचे तलाव, दगडी साठवण बंधारे, शेततळी, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे भरून द्यावेत अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
ते पुढे म्हणाले की, गोदावरी कालवा लाभक्षेत्रात काही ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे, त्यामुळे शेतक-यांच्या शेतीच्या व पुर्व भागातील काही गावांचा पिण्यांच्या पाण्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही काही शेतक-यांनी याप्रश्नाची तातडीची निकड मांडलेली आहे. सध्या गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी सोडण्यात आले आहे, हे पाणी कालवा लाभक्षेत्रातील गांवतळी, पिण्यांचे पाण्यांचे तलाव, दगडी साठवण बंधारे, शेततळी, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे यात सोडल्यास त्याचा शेतक-यांना फायदा होणार आहे. परिणामी भूगर्भातील पाण्यांच्या पातळीत वाढ होईल व आगामी उन्हाळ हंगामात शेतक-याकडील जनावरांच्या पिण्यांचा पाण्यांचा प्रश्न काही प्रमाणांत सुटण्यास मदत होणार आहे. तेव्हा नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधीत कालवा उप अभियंता व शाखा अभियंत्यांना याबाबतचे काटेकोर नियोजन करून हे सर्व बंधारे ओव्हरफलोच्या पाण्याने भरून देणेबाबत कार्यवाही करावी असेही कोल्हे शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *