श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना राज्यपालांच्या हस्ते ‘नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार’ प्रदान..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- शिर्डीच्या श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतीय प्रशासन सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.


विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच करोना संसर्ग काळात आघाडीवर राहून नेतृत्व प्रदान करणाऱ्या ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २०) ‘नवभारत गव्हर्नन्स’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी श्रीमती बानायत यांना विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील आठवड्यात त्यांना नवी दिल्ली स्थित स्कॉच फौंडेशनचा भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘स्कॉच नॅशनल ॲवार्ड (skoch award)’ ऑनलाईन प्राप्त झाला आहे.
पुरस्कारानंतर घेतल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष राज्यपालांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, पाश्चात्य देशात करोनामुळे मृत्यूचे थैमान सुरु असताना प्रशासन, पोलीस व वैद्यकीय क्षेत्रातील अद्भुत कामगिरीमुळे भारताने करोनावर यशस्वीरित्या मात केली. करोना संसर्ग काळात वॉर्ड बॉय पासून वैद्यकीय संचालकांपर्यंत, पोलिस शिपायापासून महासंचालकांपर्यंत, फेरीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत तसेच समाजसेवकांनी तनमनधनाने योगदान दिले. मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दिशादर्शन केल्यामुळेच हे कार्य साध्य झाले.
श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, रस्ते विकास महामंडळाचे राधेश्याम मोपलवार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, पालिकेचे अपर आयुक्त सुरेश काकाणी यांसह विविध क्षेत्रातील प्रशासकीय प्रमुखांचा राज्यपालांच्या हस्ते ‘नवभारत गव्हर्नन्स’पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *