के.जे.सोमैया महाविद्यालयात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-संस्था व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यामधील महत्वाचा सेतु म्हणजे कार्यालय विभाग हा असतो. हा विभाग जर सुशिक्षित व प्रशिक्षित असेल तर महाविद्यालयाचा विकास निश्चितच होतो. असे मत मा. मुंजाजी रासवे उपकुलसचिव, शैक्षणीक विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी केले. स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय ई कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मा. रासवे पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी नवनवीन कल्पना राबवून विविध तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासकीय कामात योगदान दिले पाहिजे. कार्यालयीन कामकाज पारंपारिक पद्धतीने न करता डिजिटल संकलनावर भर दिल्यास काम व वेळेत बचत होईल. असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे हे उपस्थित होते.
‌ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी कार्यशाळेच्या निमित्ताने शुभ संदेश देतांना आजचा विद्यार्थी हा देशाचा कणा असतो. आपल्या देशाचे उज्वल भविष्य विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी चांगले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तयार झाले पाहिजे. त्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज असते असे नमूद केले. या कार्यशाळेत सा. फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील जवळपास ९० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे यशस्‍वीपणे आयोजन केल्‍याबद्दल को.ता.ए.सोयायटीचे सचिव अॅड. एस.डी. कुलकर्णी व विश्‍वस्‍त श्री. संदीपराव रोहमारे यांनी कौतुक केले.
या राज्यस्तरीय कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी केले. कार्यशाळेचे सुरेख सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी केले तर श्री. संजय पाचोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *