कोपरगाव प्रतिनिधी:- “प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन माझा जो सन्मान केला आहे, त्यामुळे मी आज पर्यंत शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात एका निष्ठेने जे कार्य करीत आलो आहे त्याला बळ प्राप्त झाले असून यापुढे अशाच प्रकारचे काही दृढ संकल्प माझ्या मनामध्ये आहेत ते पूर्ण करण्यास या पुरस्कारामुळे मला अधिक प्रेरणा मिळाली आहे”, असे भावपूर्ण उद्गार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे व लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे(आण्णा) यांनी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी के जे सोमैया व के बी रोहमारे महाविद्यालय कोपरगाव, चासनळी व जवळके इत्यादी शैक्षणिक संकुलांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उत्तर देताना मनोगतात प्रकट केले.
के . जे सोमैया महाविद्यालयात संपन्न झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव एडवोकेट संजीव दादा कुलकर्णी हे होते. मा. रोहमारे पुढे म्हणाले की “मला माजी आमदार के. बी. रोहमारे यांच्या राजकारणाचा वारसा असला तरी नंतर राजकारणामध्ये शिरलेल्या अर्थकारणाचा मनापासून तिरस्कार वाटू लागला. त्यामुळे त्यापासून मी दूर रहाणेच पसंत केले व शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात रस घेतला. 1985 ला मूक बधिर व अपंग विद्यालय सुरू केले. आरंभी त्यासाठी खूप अडचणी आल्या मात्र आज हे विद्यालय अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श विद्यालय मानले जाते. त्याचे श्रेय परिसरातील व्यापारी, शेतकरी यांनी जे सहकार्य केले त्यांचा मी मनापासून ऋणी आहे.”
“1990 ला मी डॉ. वासुदेव मुलाटे व डॉ. गणेश देशमुख यांच्या सहकार्याने पोहेगाव येथे पहिले मध्य महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन घेतले. या संमेलनास आनंद यादव, रा. रं. बोराडे, नागनाथ कोतापल्ले, रावसाहेब कसबे व रामदास फुटाणे यांच्यासारखे ख्यातनाम लेखक आले होते व त्यामुळे माझा त्यांच्याशी जवळून परिचय झाला. तेव्हाच आम्ही पहिला भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराचे वितरण केले. तेव्हापासून आजतागायत या पुरस्काराच्या निमित्ताने मंगेश पाडगावकर, विठ्ठल वाघ, ना.धो.महानोर, द.मा.मिरासदार व फ.मु.शिंदे आदी. कितीतरी दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हा पुरस्कार काहीही झाले तरी बंद करू नका असे तळमळीने मला सांगितले व या सर्व गोष्टींमुळे मी राजकारणापासून अधिक दूर गेलो व तन-मन-धनाने या कार्याला वाहून घेतले.”
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य मा. चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, “के. बी. साहेबांच्या निधनानंतर खांद्यावर आलेली मोठी जबाबदारअण्णांनी अतिशय क्षमतेने पेलली व आपल्या सचोटी, शिस्त व प्रामाणिकपणाने आजवर पुढे नेली. त्यामुळे सोमैया महाविद्यालय अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकित महाविद्यालय म्हणून नावारूपास आले.” चासनळी स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य श्री. पंडितराव चांदगुडे म्हणाले की, “1974 मध्ये अण्णा युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना आमच्या गावची बंद पडलेली यात्रा आण्णांमुळे मुळे सुरू झाली. आण्णांनी के. बी. साहेबांच्या राजकीय वारशाचा कधीच गैरफायदा घेतला नाही. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य बघूनच आण्णांना प्रवरा इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस ने जीवनगौरव पुरस्कार दिला.” जवळके स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब रहाणे म्हणाले की, “आण्णांचा निगर्वी आणि मितभाषी स्वभाव तसेच अर्थकेंद्रित राजकीय राजकारणापासून दूर राहून उभे केलेले शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे आहे. जवळके कनिष्ठ महाविद्यालयात आज ६००च्या आसपास विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. त्या विद्यार्थी आणि पालकांच्या दुवा आण्णांच्या पाठीशी आहेत.”
संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व चासनळी स्कूल कमिटीचे सदस्य मा. मनीष गाडे यांनी ही याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने आण्णांचा सत्कार करुन आणि त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक व प्राध्यापक इतर सेवकांच्या वतीने बोलताना डॉ. गणेश देशमुख म्हणाले की “31 वर्षापूर्वी मा. आण्णांचे बोट धरून कै. के.बी. दादांकडे जाऊन महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्याच्या चळवळी प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरु करण्याचा आग्रह केला व दादांनी तो मान्य केला. राजकीय क्षेत्रात आमदारकीची संधी देऊन देखील मोठेपणाने ती नाकारत राजकारणातील लबाडी मला सहन होणार नाही. शैक्षणिक क्षेत्र हेच माझे खरे क्षेत्र आहे. असे आण्णा म्हणाले आणि म्हणूनच आज कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी चा वटवृक्ष झाला.”
अध्यक्षीय भाषण करताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍड. संजीव दादा कुलकर्णी म्हणाले की, “आण्णांचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य बघुन मला क्षणभर का होईना सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची आठवण झाली. अण्णांनी घरी कधीही कोणतेही काम केले नसेल परंतु कोपरगावातील मूक-बधिर विद्यालयासाठी घरोघर फिरून धान्य व भाजीपाला जमा करतांना मी त्यांना पाहिले आहे. ते कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष झाले तेव्हा मी सचिव झालो. पण आजपर्यंत कधीही आमचे मतभेद झाले नाहीत त्यामुळेच लायन्स मूक बधिर व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अस्तित्व आहे. आण्णा मूकबधिर विद्यालयाचे एकखांबी तंबू होत.”
या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या तीनही कॉलेजच्या वतीने स्पुकटो (प्राध्यापक संघटना) च्या स्थानिक शाखा व संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने आण्णा व सौ शोभाताई रोहमारे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करताना आण्णांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देताना म्हटले की, दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एक तरी विषयाचे गोल्ड मेडल आमच्या विद्यार्थ्याला मिळते हा सर्व आण्णांच्या गुणवत्ता वाढीच्या ध्यासाचा परिणाम आहे.त्यांच्या कार्यापुढे मी नतमस्तक होतो.” या कार्यक्रमास को.ता.एज्यु. सोसायटीचे सदस्य मा. सुनील शिंदे , मा. रावसाहेब रोहमारे, सौ. मंदाताई रोहमारे, ऍड. राहुल रोहमारे व मा. संदीप रोहमारे तसेच कोपरगाव, चासनळी व जवळके येथील तीनही कॉलेजचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, परिसरातील नागरिक, सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. जिभाऊ मोरे यांनी कार्यक्रमाची भूमिका कथन केली त्याचबरोबर अण्णांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉ. संजय अरगडे यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ. बी.एस. गायकवाड, डॉ. एन. जी. शिंदे, आदी प्राध्याक व कार्यलयीन कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळी:- के.जे.सोमैया वरिष्ठ व के. बी.रोहमारे कनिष्ट महाविद्यालय कोपरागाव, के.बी. रोहमारे महाविद्यालय चासनळी व जवळके या शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना मा. अशोकराव रोहमारे, समोर उपस्थित प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, प्रतिष्टीत नागरिक आदी.
