Uncategorized

सोमैया विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता पारे यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार…

कोपरगाव
(साकरवाडी) प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता पारे यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना अहिल्यानगर येथे आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला.

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड तसेच लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. पारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक व गणित अध्यापक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. सुनिता पारे यांनी मुख्याध्यापिका म्हणून विद्यार्थीकेंद्री शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, नावीन्यपूर्ण उपक्रम, शिक्षक-पालक समन्वय, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमैया विद्यामंदिरने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधत परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. समीर सोमैया, सचिव श्री. सुहास गोडगे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालकांनी डॉ. पारे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. पारे यांना प्राप्त झालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे सोमैया विद्यामंदिरच्या शैक्षणिक कार्याचा गौरव जिल्हास्तरावर झाला असून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली आहे. या गौरवाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून शिक्षण क्षेत्रात हा पुरस्कार प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *