
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – राज्यात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून सर्वसामान्यांची आयुष्यभराच्या कष्टाची कमाई एका क्षणात लुटली जात आहे. याचे लोन कोपरगाव मतदार संघात देखील पोहोचले आहे.ह्याची गंभीरपणे दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या सायबर गुन्हेगारी बाबत मंगळवार (दि.२४) रोजी २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उत्तराच्या काळात तारांकित प्रश्न उपस्थित करून राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीकडे सरकारचे लक्ष वेधले.
कोपरगाव शहरातील जानेवारी महिन्यात एका सेवानिवृत्त शासकीय अधिकारी असलेल्या दाम्पत्याची तब्बल ८७ लाख ३० हजार ४०० रुपयांची फसवणूक झाल्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. डीजीटल अरेस्टच्या नावाखाली घडलेला फसवणुकीचा प्रकार हा सायबर गुन्हेगारांशी सबंधित असल्यामुळे सुरुवातीलाच हा गुन्हा सायबर विभागाकडे का वर्ग करण्यात आला नाही? तसेच हा गुन्हा १८ दिवसानंतर का नोंदवला गेला? फसवणुकीच्या एकूण रुपये ८७ लाख रक्कमेपैकी ७८ लाख रुपये रक्कम होल्ड करून ठेवली असली तरी उर्वरित ०९ लाख रुपयांबाबत काय कार्यवाही केली? सदरचा गुन्हा पूर्णतः डिजिटल असल्यामुळे हा गुन्हा सायबर विभागाकडे त्याच दिवशी वर्ग करणे आवश्यक असतांना हा गुन्हा सायबर विभागाकडे वर्ग करण्यात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
राज्याच्या गृह विभागाची जबाबदारी सांभाळत असलेले राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी या तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, फसवणूक झालेल्या दाम्पत्याच्या ७८ लाख रुपयांवर सायबर क्राईम विभागाकडून होल्ड लावण्यात आला आहे. उर्वरित रक्कमेवर संबंधित विभागाची पडताळणी सुरु असून लवकरच संपूर्ण रक्कम त्या दाम्पत्याला मिळणार असल्याचे सांगितले.

सायबर गुन्हेगारीबाबत बहुतांश देशांसोबत आपले करार आहेत त्यामुळे अशा काही फसवणुकीच्या प्रकरणात ज्या देशांसोबत आपले करार आहेत त्या देशात फसवणुकीची रक्कम गेल्यास ती रक्कम लवकर परत मिळवता येते परंतु ज्या देशांसोबत आपले करार नाही त्या देशांतून रक्कम परत मिळविण्यात विलंब होतो. डिजिटल अरेस्टच्या अशा कोणत्याही जाळ्यात नागरिकांनी अडकू नये यासाठी सरकारच्या वतीने विविध उपाययोजना व जन-जागृती केली जात आहे. नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये या करिता काळजी घेण्यास सांगितले.
सर्वसामान्य नागरिक आयुष्यभर कष्ट करून एक एक पैसा जमवतो. हा पैसा सुरक्षित राहावा म्हणून तो बँकेत ठेवतो परंतु वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे त्या कमाईवर डल्ला मारला जावून आपली आयुष्याची कमाई काही सेकंदात गमावण्याची वेळ असंख्य नागरीकांवर येत आहे. हे केवळ कोपरगावच्या एका कुटुंबाबाबत घडले नसून देशातील व राज्यातील लाखो नागरीक दररोज या सायबर चोरांच्या जाळ्यात अलगदपणे अडकत आहेत. याकडे आमदार आशुतोष काळे यांनी सरकारचे लक्ष वेधल्यामुळे यावर सरकार अधिक ठोस पावले उचलणार असून सर्वसामान्य नागरीकांची आयुष्यभराची कमाई सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

फोटो ओळ-आमदार आशुतोष काळे यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारी बाबत तारांकित प्रश्न मांडत सरकारचे लक्ष वेधले.
