

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
भारतीय कृषि अनुसंधान परिषद पदव्युत्तर व आचार्य पदवीकरीता विद्यार्थ्यांना रु. 100 कोटीपेक्षा जास्त शिक्षवृत्ती देते तसेच दरवर्षी 30 विद्यार्थ्यांना परदेशात जावून पदव्युत्तर आचार्य पदवीसाठीसुध्दा शिष्यवृत्ती देते. कृषि अनुसंधान परिषदेने 2024-25 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पदवीसाठी नविन अभ्यासक्रम लागु केला आहे. विकसीत भारत 2047 घडविण्यासाठी शाश्वत शिक्षण व तंत्रज्ञान गरजेचे असल्यामुळे भारतीय कृषि अनुसंधान परिषद शिक्षणाकडे गांभिर्याने लक्ष देत असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या सहाय्यक महासंचालक डॉ. सिमा जग्गी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या उद्यानविद्या (फळपिके) विभागातील प्राध्यापकांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्रामार्फत हवामान बदल ः कमी वापरात असलेल्या दुर्लक्षित फळपिकांच्या उत्पादन तंत्रज्ञानामध्ये अलिकडच्या काळातील प्रगती या विषयावरील 21 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन डॉ. सिमा जग्गी बोलत होत्या. दि. 5 ते 25 फेब्रुवारी, 2025 कालावधीत या राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के होते. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक डॉ. बी.टी. पाटील व नोडल अधिकारी डॉ. एम.आर. पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. सिमा जग्गी पुढे म्हणाल्या की सदरचे प्रशिक्षण हे भारताच्या विविध राज्यातून आलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षणाचा फायदा त्या त्या राज्यातील विविध संशोधन प्रकल्प तयार करण्यासाठी तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे प्रशिक्षणार्थींना तंत्रज्ञानातील कौशल्य विकसीत करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की देशाचे फळपिकाखाली असलेले क्षेत्र दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचबरोबर दुर्लक्षीत फळपिकांमध्ये असलेल्या पौष्टीक मुल्यांमुळे या फळपिकांवर देखाल अधिकचे संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरच्या प्रशिक्षणाचा विषय अत्यंत महत्वाचा व उपयुक्त आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाचा उपयोग आपआपल्या राज्यातील दुर्लक्षीत असलेल्या विविध वनस्पती शोधून त्यावर संशोधनासाठी करावा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बी.टी. पाटील यांनी या 21 दिवसीय प्रशिक्षणामध्ये घेतलेल्या एकुण 52 विविध व्याख्याने, सात प्रात्यक्षिके व चार दिवसांच्या विविध प्रक्षेत्रावरील भेटीसंबंधी माहिती दिली. या प्रशिक्षणाच्या कार्यकाळात प्रशिक्षणार्थींनी बारामती, राजगुरुनगर व पुणे येथील केंद्रीय संशोधन संस्था तसेच कृषि विज्ञान केंद्र, बारामती व नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी या ठिकाणी भेटी दिल्या. या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रासह सहा राज्यातील 17 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणाचे सहसमन्वयक डॉ. ज्ञानेश्वर क्षिरसागर यांनी तर आभार प्रशिक्षणाचे सहसमन्वयक डॉ. जितेंद्र ढेमरे यांनी मानले. यावेळी उद्यानविद्या विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
