संवत्सर ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे गणेश बंधारा फुटून शेतकऱ्यांचे नुकसान ग्रा. पं. सदस्य महेश परजणे यांचा आरोप,, 60 लाखांवर रक्कम खर्चूनही बंधारा फुटला; चौकशीची मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरातील रोहोम-बारहाते वस्तीजवळ असलेला गणेश बंधारा आतापर्यंत तीनवेळा फुटला असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजवर या बंधाऱ्याच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आणि गाळ काढण्यासाठी संवत्सर ग्रामपंचायतने सुमारे 60 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्याचे दाखवले आहे. एवढी रक्कम खर्च करूनही हा बंधारा फुटलाच कसा? असा सवाल ग्रामपंचायत सदस्य महेश शंकरराव परजणे यांनी उपस्थित केला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने पुन्हा एकदा हा बंधारा फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीस ग्रामपंचायतच जबाबदार आहे, असा आरोपही महेश परजणे यांनी केला आहे.
संवत्सर परिसरातील शेतकऱ्यांनी आणि रहिवाशांनी या भागातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी तसेच रहिवाशांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सहकारमहर्षी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडे बंधारा बांधण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून सन 1991-92 मध्ये सुुमारे 7 लाख रुपये खर्च करून या परिसरात गणेश बंधारा बांधला. या बंधाऱ्याची साठवण क्षमता 1.75 दशलक्ष घनफूट इतकी आहे. हा बंधारा बांधण्यामागे संवत्सर परिसरातील वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा होऊन रहिवाशांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चांगली सोय व्हावी, हा स्व. शंकरराव कोल्हे यांचा उद्देश होता. मात्र, त्यांचा हा उद्देश काही सफल झाला नाही. कारण या भागातील वाड्या-वस्त्यांवर आजही पाणीटंचाई भेडसावत आहे. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्याची वणवण भटकंती करावी लागत आहे.
आजपर्यंत हा बंधारा तीनवेळा फुटला आहे. 8 ऑगस्ट रोजी कोपरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पढेगाव महसूल मंडळात तब्बल 110 मिलीमीटर पाऊस पडला. या पावसाच्या पाण्याने गणेश बंधारा पूर्ण क्षमतेने भरला होता; परंतु मुंगेर पडल्यामुळे बंधाऱ्याचा 40 फूट रूंद व 30 फूट खोलीचा मातीचा भराव वाहून गेला आणि या बंधाऱ्यात साठलेले पाणी वाया गेले. शिवाय या भागातील अडीचशे ते तीनशे एकर शेती क्षेत्र बाधित झाले. याआधी दोन वेळा हा बंधारा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा हा बंधारा फुटल्याने नुकसानीत भर पडली.
या बंधाऱ्याची देखभाल, दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामावर संवत्सर ग्रामपंचायतकडून 60 लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे सांगण्यात येते. एवढा खर्च करूनही हा बंधारा फुटलाच कसा हे एक आश्चर्यच आहे. या बंधाऱ्याला पूर्वी गोडबोले पद्धतीचे गेट बसवण्यात आले होते;पण ते काही दिवसांपूर्वी काढण्यात आले. जर हे गेट असते तर हा बंधारा फुटला नसता आणि नुकसान टळले असते. ग्रामपंचायतीच्या खाबूगिरीमुळे आणि निष्काळजीपणामुळे आता तिसऱ्यांदा हा बंधारा फुटून शेतीचे आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यास ग्रामपंचायतच जबाबदार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी केली आहे.
दरम्यान, परवा गणेश बंधारा फुटल्यानंतर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेने पोकलेन आणि जेसीबीच्या मदतीने या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्याबद्दल या परिसरातील रहिवासी आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसंदर्भात त्यांनी कारखान्याच्या यंत्रणेला सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *