
कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकार चळवळीमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विशेष प्रयत्न करावे. प्रत्येक सहकारी चळवळीतील पतसंस्थेच्या संचालक मंडळात युवा संचालकांसाठी राखीव जागा असाव्यात तसेच ट्रेनी संचालकांची ही निवड करण्यात यावी. संस्थेच्या सभासदांमध्ये जी संस्था युवक सभासदांचे प्रमाण वाढवेल त्या संस्थेला सहकार विभागाच्या लेखापरीक्षणात विशेष गुण द्यावेत. त्याचप्रमाणे सहकारी पतसंस्थांनी युवक सभासदांच्या ठेवीवर जास्त व्याजदर द्यावा. या व्यतिरिक्त एखादी संस्था अडचणीत आल्यास त्या संस्थेच्या होणाऱ्या तोट्याला संचालक मंडळाला जबाबदार धरले जाते, त्याप्रमाणे त्या संस्थेच्या नफ्यात देखील संचालकांचा सहभाग असावा म्हणजे बिझनेस करिअर म्हणून देखील युवा पिढी पतसंस्थांकडे आकर्षित होतील.असे ठराव महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आले

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त शिर्डी येथील राज्य पतसंस्था फेडरेशनचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र येथे युवा सहकार परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी वरील ठराव मंजूर करण्यात आले.
युवा सहकार परिषदेच्या उद्घाटक बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेच्या आमदार सौ.श्वेताताई महाले म्हणाल्या की, महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीमध्ये तसेच देशातील सहकारी चळवळीमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार खात्याने विशेष प्रयत्न करावे यासाठी देशाचे सहकार मंत्री मा.श्री.अमित शहा यांच्याकडे प्रयत्न करू.
तसेच अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेचे युवा संचालक श्री. श्री अभिजीत पाटील यांनी पतसंस्था चळवळीत मार्केटिंग चे महत्व, अहमदनगर जिल्ह्यातील व्यंकटेश मल्टीस्टेट पतसंस्थेचे युवा संचालक अविनाश शिंदे यांनी पतसंस्था चळवळीत आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व,अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे युवा संचालक यांनी मी अनुभवलेली स्कॉटलंडची स्कॉटलंडची सहकार परिषद तर कोल्हापूर जिल्ह्यातील पिहिताश्रव पतसंस्थेचे युवा संचालक श्री रमेश मिठारे यांनी पतसंस्था चळवळीत कर्मचाऱ्यांचा सहभाग या विषयाच्या अनुषंगाने उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष श्री सुदर्शन भालेराव,अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधीचे अध्यक्ष श्री सुरेश वाबळे, कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे,अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेचे संचालक श्री.अभिजीत पाटील, अहमदनगर येथील व्यंकटेश मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक श्री अभिनाथ शिंदे, नांदेड येथील गोदावरी अर्बन पतसंस्थेचे संचालक श्री धनंजय तांबेकर, वसई येथील वसई प्रगती पतसंस्थेचे संचालक श्री प्रकाश भोईर, माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक श्री रविंद्र कानडे,जालना येथील महालक्ष्मी पतसंस्थेचे संचालक श्री दिपक तुपकर, अहमदनगर येथील जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक श्री अक्षय नवले, नाशिक येथील अर्थ पतसंस्थेचे संचालक श्री. नचिकेत पाटील, छत्रपती मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक श्री. संतोष भंडारी, कोल्हापूर येथील पिहीताश्रव पतसंस्थेचे संचालक श्री रमेश मिठारे, सांगली येथील जनसेवा पतसंस्थेचे संचालक श्री संदीप माळी, पुणे येथील डोळसनाथ पतसंस्थेच्या संचालिका तस्लिम शिकलकर आदिंसह महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांचे युवा चेअरमन,युवा पदाधिकारी,युवा अधिकारी,युवा कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुरेखा लवांडे यांनी मानले.
