काँग्रेसी विचारधारेचा समर्पित कार्यकर्ता हरपला:- छगन भुजबळ…

कोपरगाव

आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने मागासवर्ग चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई) :- काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसी विचारधारेचा समर्पित कार्यकर्ता हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, कुठल्याही समाजात नेतृत्व तयार होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यात मागासवर्ग समाजातून पुढे येत असतांना अनेक अडचणींचा सामना करत आमदार रणपिसे यांनी समाजसेवेचे व्रत जोपासले होते. विधिमंडळात मुद्देसूद विषयांची मांडणी करणे ही रणपिसे यांची खासियत होती. काँग्रेसची विचारधारा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांनी आयुष्यभर पार पडली. सभागृहात ते नेहमीच अभ्यासू भाषण करत होते. आपल्या संसदीय कार्यात त्यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली. शरदराव रणपिसे यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचं तसेच मागासवर्ग चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

श्री रणपिसे यांची विविध विषयांवर अभ्यासू मतं आणि मांडणी सातत्याने नवीन नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शक राहिल. त्यांच्या निधनाने कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय श्री.शरद रणपिसे यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *