कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न; पुढील हंगामातील ७० लाख मे.टन निर्यातीचा निर्णय केंद्र शासनाने वेळेत घ्यावा..!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. अध्यक्षीय पदाची सूचना दिलीप शिंदे यांनी मांडली सदर सूचनेस धर्मा दहे यांनी अनुमोदन दिले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे उपस्थित शकले नाही त्यामुळे त्यांच्या वतीने त्यांचे मनोगत कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी मांडले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, कारखान्याचे सर्व पदाधिकारी सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या वतीने जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी सांगितले की, २०२०-२१ च्या गळीत हंगामात राज्यात ९५ सहकारी व ९५ खाजगी असे एकूण १९० साखर कारखान्यांनी घेतलेल्या गाळप हंगामात राज्यामध्ये १०१४.३० लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन १०६.६६ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले असून राज्याचा साखर उतारा १०.५२ % इतका होता. कारखान्याने २०२०-२१ च्या हंगामात ६,८८,७८४ मे.टन ऊसाचे गाळप करून ७,२९,८०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.६०% मिळाला असल्याचे सांगितले. कारखान्याने सन २०२०-२१ हंगामाची एफ.आर.पी. प्रति मे.टन रुपये २३५५=१५ असतांना त्यापेक्षा १४४=८५ ज्यादा दर देऊन प्रति मे.टन रुपये २५००/- प्रमाणे ऊस दर दिला आहे.
कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकरी हिताची जपवणूक करण्याची निर्णय आजपर्यंत घेतले आहे. तीच परंपरा यापुढे देखील सुरु राहणार आहे. केंद्र शासनाच्या नीती आयोग तसेच कृषी व मूल्य आयोगाने ऊसाची एफ.आर.पी. रक्कम (ऊसाचा किफायतशीर दर) हि हफ्ते पाडून देण्याची शिफारस केली असली तरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवणार आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे. ब्राझीलमध्ये पडलेला मोठा दुष्काळ व वातावरणातील बदलामुळे ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसत असून चालू हंगामात ४० ते ५० लाख टन साखर तुटवडा जाणवणार असल्याचा जाणकारांचा प्राथमिक अंदाज असून थायलंड देशामध्ये देखील साखरेचे उत्पन्न दरवर्षीपेक्षा कमी राहणार आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय साखरेस मागणी वाढणार असल्यामुळे २०२१-२२ चा गाळप हंगाम आशादायी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर रु.२४००/- वरून रु.३२००/- पर्यंत गेले आहे. साखरेच्या दरामध्ये स्थिरता निर्माण झाल्यास बाजाराची परिस्थिती पाहून पुढील हंगामातील साखर निर्यातीचा निर्णय योग्य वेळी घेणार आहे.
केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण मंत्रालयाने ऊसाचे एफ.आर.पी. मध्ये रुपये ५०/- ची वाढ करून १० टक्के रिकव्हरी करिता रु.२९००/- प्रति मे.टन इतकी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मागील अडीच वर्षापासुन साखरेचे किमान विक्री मूल्य (MSP) प्रतिकिलो रु.३१/- असून ते किमान रु.३४/- ते रु.३५/- प्रतिकिलो वाढविण्याची गरज आहे. येत्या हंगामात देशामध्ये ३१० लाख मे.टन साखरेचे उत्पन्न होईल असा ‘इस्मा’ (ISMA) अंदाज असून पुढील हंगामातील ७० लाख मे.टन निर्यातीचा निर्णय केंद्र शासनाने वेळेत घ्यावा अशी अपेक्षा असल्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने सांगितले.

सभेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या सभासदांनी विषय पत्रिकेवरील १ ते १३ विषय रीतसर सूचना व अनुमोदन आल्यानंतर मंजूर करण्यात आले. श्रद्धांजलीचा ठराव कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांनी मांडला. संचालक ज्ञानदेव मांजरे यांनी कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला त्यावेळी सर्व संचालक मंडळ व ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आभार संचालक अरुण चंद्रे यांनी मानले व सूत्रसंचालन सेक्रेटरी बाबा सय्यद यांनी केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार कारखान्याच्या सभासदांना सभेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उत्कृष्ट प्रकारचे नियोजन करण्यात आले होते.

फोटो ओळ:- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम कार्यकारी संचालक गिरीश जगताप व संचालक मंडळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *