
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- माजी आमदार अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून कोपरगाव तालुका एकमेकाला जोडला त्याप्रमाणे गावांना जोडणाऱ्या पुलांची व रस्त्यांची कामे पूर्ण करून गावे एकमेकांना जोडायची आहेत. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मतदार संघातील शेवटचे टोक असलेल्या धनगरवाडीपर्यंत विकासाची गंगा घेऊन जाणार असून मतदार संघाचा प्रतिनिधी या नात्याने विकासाच्या बाबतीत संपूर्ण मतदार संघाला न्याय देणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शिंगवे येथे सावळीविहिर-रुई-शिंगवे-वारी-भोजडे-गोधेगाव-शिरसगाव-सावळगाव (प्रजिमा १३) रस्त्यातील शिंगवे ते वारी रस्त्याचे ६० लक्ष निधीतून करण्यात येणारे डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या कामाचे आणि शिंगवे नाल्याजवळ ५६.६० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत मला निवडून देण्यात मतदार संघातील सर्वच सुज्ञ मतदारांचे योगदान आहे त्यामुळे संपूर्ण मतदार संघाचा विकास करणे माझी जबाबदारी आहे. विकासाच्या बाबतीत कोपरगाव तालुक्यातील गावांप्रमाणेच राहाता तालुक्यातील कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या अकरा गावांचा देखील विकास होणार आहे. मागील काही वर्षापासून पावसाळ्यात गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर वारी-शिंगवे रस्त्यावर असलेल्या ओढ्याला पाणी येत असल्यामुळे या दोनही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटत असल्यामुळे या ओढ्यावर कायमस्वरूपी पुल व्हावा अशी दोनही गावातील नागरिकांची मागणी होती. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून या पुलासाठी ५७.६० लाख रुपये निधी दिला आहे. हा पूल लवकरच पूर्ण होणार असून वारी-शिंगवे हि गावे एकमेकांना जोडली जाणार आहे. त्याप्रमाणेच मतदार संघातील रस्त्यांचा व अनुशेष भरून काढून संपूर्ण मतदार संघच एकमेकांना जोडून मतदार संघाचा विकास करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, मुरलीधर थोरात, अण्णासाहेब कोते, राजेंद्र धनवटे, दादासाहेब उगले, ज्ञानदेव चौधरी, अशोक चौधरी, भाऊसाहेब जाधव, नानासाहेब काळवाघे, सुभाष चौधरी, मच्छिंद्र चौधरी, विकास चौधरी, बाबासाहेब चवडे, सीताराम पगारे, बाळासाहेब बाभुळके, पद्माकर सुराळकर, पोपटराव चौधरी, जनार्दन बरगे, गोपीनाथ सुराळकर, प्रकाश जाधव, शिवाजीराव जाधव, चांगदेव पठारे, राजेंद्र लहारे, अशोक सुराळकर, दत्तात्रय चौधरी, विजय गडाख, किसनराव ठोंबरे, पोपट बरवंट, बबनराव बरवंट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ –
शिंगवे येथे शिंगवे-वारी रस्त्याचे भूमिपूजन व शिंगवे नाल्याजवळ पुलाच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार आशुतोष काळे
