म्युकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी; आमदार आशुतोष काळेंनी केली टास्कफोर्स समिती…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे लक्षण आढळून येत आहे. तसेच कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन म्युकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तालुका टास्कफोर्स समिती तयार केली आहे. आपले संरक्षण करण्यासाठी प्रशासन सक्षम असून नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
या बैठकीत आरोय्य विभाग व प्रशासनाला मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले कि, कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. कोपरगाव तालुक्यात देखील या म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक झाला आहे. कोविडची बाधा झालेल्यांपैकी बहुतांशी रुग्ण इतर व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी देखील अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना विशेषतः कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना सावधगिरीच्या सूचना देऊन जनजागृती करावी व योग्य ती काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. म्युकरमायकोसीच्या रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध होवून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची धावपळ होणार नाही यासाठी योग्य नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना देखील जास्त प्रमाणात कोरोनाची बाधा होण्याचा धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सूचित करण्यात आले आहेत. त्याबाबत देखील आरोग्य विभाग व प्रशासनाने गाफील न राहता त्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे.अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला व प्रशासनाला दिल्या. यावेळी म्युकरमायकोसीस या आजारासाठी कोपरगाव तालुका टास्कफोर्स समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ.कुणाल कोठारी, सदस्य-डॉ.अस्मिता लाडे, डॉ.अंजली फडके, डॉ,वैशाली बडदे, डॉ.कृष्णा फुलसौंदर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी देखील कोपरगाव तालुका टास्कफोर्स समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ.अजय गर्जे व सदस्य- डॉ.मयूर जोर्वेकर, डॉ. शंतनू सरवार, डॉ.वैशाली बडदे, सचिव म्हणून डॉ.अतिष काळे यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. वैशाली बडदे, संदीप रोहमारे, डॉ. अजय गर्जे, डॉ. अतिष काळे, डॉ. दीपक पगारे, डॉ. शंतनू सरवार, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. अंजली फडके, डॉ. कुणाल कोठारी, डॉ. हेमंत राठी, डॉ. अस्मिता लाडे, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. संतोष तिरमखे, डॉ. वरद गर्जे, डॉ. प्रियंका मुळे आदी उपस्थित होते.
चौकट- कोपरगाव तालुक्यात आमदार आशुतोष काळे प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी मदत करून केलेल्या योग्य उपाययोजनांमुळे मागील काही दिवसात कोरोनाबाधित रूग्णांची वाढलेली संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली असून रोज बाधित रुग्णांचा आकडा हा कमी कमी होत आहे. ज्याप्रमाणे कोरोना आपत्तीवर नियंत्रण मिळविले त्याप्रमाणेच आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने म्यूकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेवर देखील यशस्वीपणे मात करू- तहसीलदार योगेश चंद्रे.

फोटो ओळ- म्युकरमायकोसीस व संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *