साईबाबा संस्थानच्या माध्यमातून गोशाळा सुरू करण्यास सहकार्य करण्याची विनंती,
युवा व नारीशक्तीच्या साथीने दुष्काळावर मात करू :- स्नेहलताताई कोल्हे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनांची मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद…
कोपरगाव प्रतिनिधी
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, पशुपालक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. त्यासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून गोशाळा सुरू करण्यास सहकार्य करून दुष्काळग्रस्त भागातील गोवंशासाठी चारा, पाणी व संगोपनाची व्यवस्था करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण विनंती मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पावसाअभावी ग्रामीण भागात चारा व पाण्याची टंचाई निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम पशुधनावर होत आहे. अशा परिस्थितीत निराधार, भाकड तसेच चारा-पाण्याअभावी अडचणीत आलेल्या गोवंशासाठी संस्थानच्या माध्यमातून गोशाळा सुरू करण्यास सहकार्य मिळाल्यास मोठा आधार मिळू शकतो. साईबाबा संस्थानने या संकटाच्या काळात तातडीने सहकार्य करावे आणि चारा व्यवस्थेसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.
दुष्काळ निवारण हे केवळ शासनाचे काम नसून समाजाच्या सामूहिक सहभागातून त्याला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे. आजची ‘जेन झी’ युवा पिढी सामाजिक जबाबदारी स्वीकारून पुढे येण्यास तयार आहे. युवकांच्या माध्यमातून गोशाळांमध्ये चारा-पाणी व्यवस्था, जनजागृती, मदतकार्य आणि पशुधन संरक्षणासाठी स्वयंसेवी उपक्रम राबविता येतील.
त्याचबरोबर नारीशक्तीची साथ घेत महिलांच्या बचतगटांच्या माध्यमातूनही चारा संकलन, जनजागृती आणि सामाजिक सहभागाचे उपक्रम उभे करता येतील. शासन, साईबाबा संस्थान, सामाजिक संस्था, युवाशक्ती आणि नारीशक्ती यांनी हातात हात घालून काम केल्यास दुष्काळाच्या संकटावर निश्चितपणे मात करता येईल, असा विश्वास स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केला.
गोवंशाचे संरक्षण, शेतकऱ्यांना आधार आणि दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी साईबाबा संस्थानने तातडीने पुढाकार घ्यावा यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली. युवा व नारीशक्तीच्या साथीने आपण सर्वांनी एकत्र येऊन दुष्काळावर मात करण्यासाठी लोकचळवळ उभी करू,असे मत स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केले.
